मुंबई : मुंबईत उशिरा दाखल झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली. तसेच मुंबई महापालिकेच्या नालेसफाईचीही पुरती पोलखोल केली. मंगळवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने बुधवारी सकाळीही संततधार सुरूच ठेवल्याने मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले.
रेल्वे, रस्ते वाहतूकही मंदावली. दादर, माटुंगा, सायन, चुनाभट्टी, विक्रोळी, भांडुप आदी सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकरांचे मोठे हाल झाले. अंधेरी सबवे तुंबल्याने वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून नालेसफाईचे केलेले दावे पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे समोर आले.
महापौर रितू तावडे यांनी बुधवारी पाणी तुंबणाऱ्या हिंदमाता, गांधी मार्केट, अंधेरी सब वे आदी ठिकाणी पहाणी दौरा केला. यावेळी गांधी मार्केट येथे पहाणी सुरू असताना महापौरांच्या देखत एक मुकादम उघड्या मॅनहोल मध्ये पडल्याने एकच खळबळ उडाली. त्याला तातडिने वाचविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, कुलाबा येथे २४ तासांत २४७.८ मिमी तर सांताक्रूझ येथे २२४.८ मिमी पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासात शहर व उपनगरात आकाश अशंत: ढगाळ राहून मेघगजनेसह मध्यम ते जोरदार व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शहर आणि उपनगरात बुधवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. हवामान विभागानेही मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले आणि मुंबईकर आनंदले.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज' अलर्ट
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई आणि शेजारील ठाणे व पालघर जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये पुढच्या २४ तासांत विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
रुळांवर पाणी भरल्याने रेल्वे मंदावली
यंदा केरळ येथे उशिराने दाखल झालेला मोसमी पाऊस मुंबईतही १२ दिवस उशिराने दाखल झाला आणि पहिल्याच दिवशी दमदार कोसळला. मंगळवारी रात्रीपासून मुसळधार कोसळलेल्या पावसांमुळे मुंबई आणि उपनगरांतील सखल भागात पाणी साचले. माटुंगा, दादर येथे रेल्वे रुळांवर पाणी भरल्याने रेल्वेसेवा उशिराने धावत होत्या. कुर्ला, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, दादर, परळ, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, मालाड, मालवणी, पवई, विक्रोळी, साकीनाका, घाटकोपर, भांडुप, चेंबूर, मानखुर्द आदी ठिकाणी पाणी साचले. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरल्याने रस्ते वाहतूकही मंदावली.
मुसळधार पावसामुळे सकाळी कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना अडचणींना सामोरे जावे लागले. रेल्वे उशिराने धावल्याने प्रचंड गर्दीतून प्रवाशांना प्रवास करावा लागला. अनेकांना कार्यालयात पोहचण्यास उशीर झाला. दरम्यान २४ तासात शहरात १५५ मिमी, पूर्व उपनगरात १६७ मिमी तर पश्चिम उपनगरात २०८ मिमी पावसाची नोंद झाली. महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रांच्या नोंदीनुसार, शहर व उपनगरातील सरासरी पर्जन्यमान २४ तासांत १.६५ टक्के इतके नोंदविण्यात आले.
हवामान सल्ल्यांचे पालन करा : अश्विनी भिडे
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नागरिकांना हवामान सल्ल्यांचे पालन करण्याचे आणि आणीबाणीच्या प्रसंगी नागरी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या की सर्व विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत, कारण मुसळधार पावसाची शक्यता कायम असून प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.महापौर तावडे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्यक्ष परिस्थिती आणि पाणी साचण्याची कारणे जाणून घेण्यासाठी काही परिसरांना भेट दिली.सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडल्या असल्या तरी महापालिकेची यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढ्याच कामासाठी घराबाहेर पडावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
सर्वाधिक पावसाची नोंद -
शहर विभागात एफ/दक्षिण विभागात सर्वाधिक ३३४ मिमी पाऊस पडला. पूर्व उपनगरात परळ येथील एमसीजीएम सीओआर कार्यालय परिसरात ३०० मिमी, विहार तलाव परिसरात २५२ मिमी आणि इमारत प्रकल्प कार्यालय, विक्रोळी येथे २३६ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. पश्चिम उपनगरात मालवणी परिसरात सर्वाधिक ३४० मिमी पाऊस पडला. तसेच मालाड डेपो येथे २९३ मिमी, वर्सोवा येथे २८८ मिमी आणि पी/उत्तर कार्यालय येथे २७१ मिमी पावसाची नोंद झाली.
बेस्टच्या बसमार्गांमध्ये बदल
मुंबईत बुधवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. अनेक भागांमध्ये पाणी साचणे, झाडे कोसळणे आणि इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने बेस्ट उपक्रमाला अनेक बसमार्गांमध्ये बदल करावे लागले. तसेच मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवाही विलंबाने धावत होत्या. मालाड सबवे परिसरात पाणी साचल्याने ३४५, २८१ आणि ४६० क्रमांकाच्या बससेवा कांदिवली उड्डाणपुलामार्गे वळविण्यात आल्या. गांधी मार्केट-माटुंगा मार्गावरील ६६, ५२१, ए-२२, ए-२५, ए-१९, ए-३५१, ए-३५७ आणि ए-८ या बसांना भाऊ दाजी लाड मार्ग आणि किंग्ज सर्कलमार्गे वळविण्यात आले. कुर्ला नेहरू नगर परिसरातील ५८, ५९ आणि ६० क्रमांकाच्या बससेवांमध्येही बदल करण्यात आला. विक्रोळी येथे ३ ते ४ झोपड्या कोसळल्याने ६०८ क्रमांकाच्या बसमार्गावर परिणाम झाला. तर प्रभादेवी, सीजीएस कॉलनी, वडाळा आणि सांताक्रूझ परिसरातील विविध बसमार्गही पर्यायी मार्गाने चालविण्यात आले.
पावसाची नोंद : २४ तासात
शहर : १५५ मिमी
पूर्व उपनगर: १६७ - मिमी
पश्चिम उपनगर : २०८ मिमी
येथे पाणी साचले
कुर्ला, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, दादर, परळ, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, कांदिवली, मालाड, मालवणी, गोरेगाव, वर्सोवा, पवई, विक्रोळी, साकीनाका, घाटकोपर, चेंबूर, वडाळा, मानखुर्द, घाटकोपर, भायखळा आदी भागांत पाणी साचल्याच्या तक्रारी आल्या.
शॉर्टसर्किटच्या घटना
मुंबई शहरात ३७, पूर्व उपनगरात १८ व पश्चिम उपनगरात १५ अशा एकूण ७० ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. यात कोणीही जखमी नाही.
झाडे कोसळली
शहरात ४०, पूर्व उपनगरात २३ व पश्चिम उपनगरात ५० अशा एकूण ११३ ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्याच्या घटना घडल्या
घराच्या भिंती पडल्याच्या घटना
शहरात २, पूर्व उपनगरात ३ व पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ७ ठिकाणी घराचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या त्यात कोणालाही मार नाही.
नाले सफाईचे दावे ठरले फोल
दरवर्षी नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. लोकप्रतिनिधींकडून नालेसफाईच्या कामांची पाहणी केली जाते. यंदा सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळे पाहणी दौरे केले गेले. आरोप - प्रत्यारोप झाले. प्रशासनाकडून १०० टक्के नाले सफाईचे दावे करण्यात आले मात्र हे दावे पहिल्याच पावसात फोल ठरले असल्याचे समोर आले आहे.