मुंबई : उड्डाणपुलाखाली जागेचा सदुपयोग व्हावा, या उद्देशाने विले पार्ले पूर्व विमानतळ टी वन मेट्रो स्थानका समोरील उड्डाणपुलाखाली शहरी शेती प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पात फळ भाज्यांची लागवड, शहरी शेती अभ्यास वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, उद्या रविवारी या प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या हस्ते होणार आहे.
विले पार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घाडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक मिलिंद शिंदे यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
एरवी उड्डाणपुलाखालील जागावर अतिक्रमण होत असते किंवा जुन्या गाड्यांचे डम्पिंग होत असते. त्यामुळे विलेपार्ले पूर्व येथील विमानतळाबाहेरील पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलाखालील जागेचा सदुपयोग व्हावा, या हेतूने विले पार्ले कल्चरल सेंटरतर्फे शहरी शेती प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव के-दक्षिण विभागाकडून मान्य करवून घेतला, अशी माहिती पराग अळवणी यांनी दिली.
या प्रकल्पाबाबत अधिक माहिती करून घ्यायची असल्यास मुंबई विमानतळ टी १ मेट्रो स्थानका समोरील या प्रकल्पास उद्या रविवारी संध्याकाळी ५.३० वाजता जरूर यावे, असे आवाहन आमदार पराग अळवणी व नगरसेवक मिलिंद शिंदे यांनी केले आहे.
शहरी शेती वर्ग चालवणार
या प्रकल्पात प्रत्यक्ष शास्त्रीय पद्धतीने वाफे तयार करण्यात आले असून त्यावर विविध फळ भाज्या लावण्यात येणार आहेत तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने शहरी शेती अभ्यास वर्ग चालवण्यात येणार असून यामध्ये अनुभवी व प्रशिक्षित मान्यवर प्रत्यक्ष शेतकामाविषयी मार्गदर्शन करणार आहेत.
विविध विषयांच्या कार्यशाळा घेणार
त्याचसोबत, वनस्पती वैविध्य दालन (plant diversity gallery) आणि वनस्पती सांभाळ केंद्र (plant care center) सुद्धा चालवण्यात येणार आहेत. तर फुलपाखरू उद्यान, पक्षांना आकर्षित कसे करावे, माळी काम कसे करावे इत्यादी विषयात कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.