Mumbai : बाप्पा निघाले गावाला; नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळी BMC ची जय्यत तयारी संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : बाप्पा निघाले गावाला; नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळी BMC ची जय्यत तयारी

भक्तांनी यथाशक्ती मनोभावे केलेली पूजा स्वीकारून गणपती बाप्पा आपल्या भक्तांचा शुक्रवारी निरोप घेणार आहेत.

Swapnil S

मुंबई : भक्तांनी यथाशक्ती मनोभावे केलेली पूजा स्वीकारून गणपती बाप्पा आपल्या भक्तांचा शुक्रवारी निरोप घेणार आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या गणरायाच्या विसर्जनाची जय्यत तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबई महानगर पालिकेने नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून संबंधित ठिकाणी कर्मचारी व अधिकारी तैनात केले जाणार आहेत. अग्निशमन दल, रुग्णवाहिका ठिकठिकाणी सज्ज ठेवण्यात येणार आहेत. मोठ्या प्रमाणात घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे मुंबई शहर व उपनगरात विसर्जन होत असल्यामुळे पालिकेने सर्वच विसर्जन स्थळे सुसज्ज ठेवली आहेत. पालिकेने गिरगाव, दादर, जुहू चौपाटी, सात बंगला वेसावे, गोराई, मढ, मार्वे आदी चौपट्या

तसेच पवई तलावसह अन्य कृत्रिम विसर्जन स्थळांवरही चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटीसह समुद्रकिनारे, नद्या आणि तलावांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेने कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. गणेशगक्तांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त, अग्निशमन दल, आणि आपत्कालीन पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच निर्माल्य संकलन आणि जतन करण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलश आणि वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रथमच आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष; ड्रोनची नजर, सीसीटीव्ही व हॅम रेडिओद्वारे यंत्रणांमध्ये समन्वय

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे गणेशमूर्ती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने सर्वंकष तयारी केली आहे. लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन, यंदा प्रथमच गिरगाव चौपाटीवर व्यापक स्वरूपात 'आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष' कार्यरत करण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत महापालिका, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, एनडीआरएफ आणि किनारी सुरक्षा यंत्रणांमध्ये तातडीने समन्वय साधण्यासाठी हा कक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

अनंत चतुर्दशीला शुक्रवारी मुंबईतील मोठ्या संख्येने गणेशमूर्तीचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर चौपाटी परिसरात प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, तात्पुरती स्वच्छतागृहे, प्रथमोपचार केंद्रे, रुग्णवाहिका, सुरक्षा व गर्दी नियंत्रणासह विसर्जनासाठी आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.

उपायुक्त चंदा जाधव आणि डी. विभागाचे सहायक आयुक्त संतोष साळुंके यांच्या समन्वयाने आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात मुख्यालयातील महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, बेस्ट, मुंबई पोलीस, मुंबई अग्निशमन दल, आरोग्य विभाग, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) तसेच अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे हॅम चालक उपस्थित राहणार आहेत.

दोन ड्रोन तैनात

गिरगाव चौपाटी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी डी विभागाकडून नियंत्रण कक्षात स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय विसर्जनादरम्यान एखादी दुर्घटना घडल्यास तिची माहिती तातडीने मिळावी यासाठी दोन ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे समुद्रकिनारा, विसर्जनस्थळ आणि भाविकांच्या गर्दीवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येणार आहे.

हॅम रेडिओसह डिजिटल मोबाईल रेडिओ

आपत्कालीन परिस्थितीत संपर्क व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी नियंत्रण कक्षात भ्रमणध्वनी, डिजिटल मोबाईल रेडिओ आणि हॅम रेडिओची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून अग्निशमन दल, पोलीस, आरोग्य विभाग, किनारी सुरक्षा यंत्रणा आणि अन्य संबंधित विभागांशी तातडीने संपर्क साधून आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.

वातावरणात भक्तिमय आज बाप्पाला निरोप; सहा फुटांपर्यंत मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन

मुंबई : 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जयघोषात शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईकर लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येणार आहेत. गणेश विसर्जन सोहळा सुरक्षित, सुरळीत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावा यासाठी मुंबई महापालिकेने व्यापक तयारी केली असून २५ हजार अधिकारी आणि कर्मचारी विविध विसर्जनस्थळांवर तैनात करण्यात आले आहेत.

मुंबईत यंदा ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळांसह २७८ ठिकाणी ३८३ हून अधिक कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सहा फूट उंचीपर्यंतच्या गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करणे बंधनकारक करण्यात आले असून त्यासाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जुहू, माहिम, वर्सोवा, मार्वे गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क आदी प्रमुख नैसर्गिक विसर्जनस्थळांवर तसेच कृत्रिम तलावांच्या ठिकाणी महापालिकेसह मुंबई पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि विविध यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विसर्जन व्यवस्थेसाठी १,१९४ स्टील प्लेट्स, २३ जर्मन तराफे, ३४ क्रेन, ८५ रुग्णवाहिका आणि १० मोटरबोटी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच १,१३२ जीवरक्षक तैनात करण्यात आले असून ६,०५२ फ्लडलाइट्स आणि सर्चलाईट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी येथे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने समन्वय साधता यावा यासाठी विशेष आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाने नागरिकांना विसर्जनादरम्यान सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्याचे आणि पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, दुष्काळाबाबत मदतीचा आदेश आज निघणार

सरकारला गाठले खिंडीत; मोदी, शहा, ज्ञानेशकुमार 'देशद्रोही' : राहुल गांधी यांचा घणाघात

राहुल गांधींचे राजकीय ज्ञान 'शून्य' : भाजपचे सुधांशु त्रिवेदी यांचा पलटवार

ज्ञानेशकुमारांना ४८ तासांची मुदत; CJP चा पुन्हा आंदोलनाचा इशारा

निवडणुकांचे निकाल फिक्स करणारे 'ज्ञानेशगेट'