बाप्पा...पुढच्या वर्षी लवकर या! १२ दिवसांच्या ३६ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन; गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या गजराने मुंबई दुमदुमली छायाचित्र : विजय गोहिल
मुंबई

बाप्पा...पुढच्या वर्षी लवकर या! १२ दिवसांच्या ३६ हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन; गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या गजराने मुंबई दुमदुमली

तब्बल २४ तासांनंतर सकाळी १०.४५ वाजता अलोट लालबागच्या राजाचे गर्दीत विसर्जन पार पडले. यावेळी इच्छापूर्ती बाप्पाची एक झलक डोळ्यात सामावून घेण्यासाठी लाखोंचा जनसागर गिरगाव चौपाटीवर उसळला होता. दरम्यान, मुंबईत १२ दिवसांच्या ३६ हजार १२८ गणेश मूर्तीचे विसर्जन पार पडले.

Swapnil S

मुंबई : मुंबईचा राजा, मानाचा गणपती अर्थात गणेश गल्लीतील बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक शुक्रवारी सकाळी ९.३०च्या सुमारास निघाली. त्यानंतर मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाची मनोभावे पूजा केल्यानंतर सकाळी ११ वाजता वाजतगाजत मिरवणूक निघाली. कोळी बांधवांनी पूजाअर्चा केली आणि ढोल-ताशांचा गजर, फुले, गुलालाची उधळण करत मोठ्या दिमाखात लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघाली. शुक्रवारी सकाळी निघालेली मिरवणूक मार्गस्थ होत शनिवारी अर्थात दुसऱ्या दिवशी गिरगाव चौपाटीवर पोहोचली आणि तब्बल २४ तासांनंतर सकाळी १०.४५ वाजता अलोट लालबागच्या राजाचे गर्दीत विसर्जन पार पडले. यावेळी इच्छापूर्ती बाप्पाची एक झलक डोळ्यात सामावून घेण्यासाठी लाखोंचा जनसागर गिरगाव चौपाटीवर उसळला होता. दरम्यान, मुंबईत १२ दिवसांच्या ३६ हजार १२८ गणेश मूर्तीचे विसर्जन पार पडले.

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी तीन ते चार महिने आधीपासून भक्त आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. दरवर्षी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भक्त मुंबईत येत असतात. उंचच उंच मूर्ती, आकर्षक देखावे भक्तांसाठी पर्वणी ठरते. हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता श्री गणेशाची यंदा १४ सप्टेंबर रोजी घराघरात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत प्रतिष्ठापना करण्यात आली.

मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून दोन लाखांहून अधिक घरांमध्ये बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येते. बाप्पाची १२ दिवस मनोभावे पूजा अर्चा करण्यात येते. मात्र बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते त्यावेळी भक्तांना अश्रू अनावर होतात. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही मुंबईत मोठ्या उत्साहात बाप्पांचे स्वागत व विसर्जन पार पडले. १४ सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून अर्थात दीड दिवसांच्या बाप्पाला आंनदाश्रूत निरोप देण्यात आला. दीड दिवसांचे बाप्पा, पाच दिवसांचे बाप्पा, सात दिवसांच्या बाप्पांसह गौरींचे मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले.

लालबागच्या राजाचे २४ तासांनी विसर्जन

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला अलोट गर्दीने शनिवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक मिरवणुकीत सहभागी झाले. गल्ल्या, चाळी, रस्ते, चौक गर्दीने फुलले होते. लालबागचा राजा शनिवारी सकाळी आठनंतर गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यावेळी गिरगाव चौपाटीवर राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी लोटली होती. यांत्रिक तराफ्याच्या सहाय्याने राजाला खोल समुद्रात नेऊन सकाळी १०.४५ च्या सुमारास तब्बल २४ तासांनंतर भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला. शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेल्या गणपती बाप्पांचे विसर्जन शनिवारी सकाळपर्यंत सुरु होते. यात सार्वजनिक ६,९३६ तसेच घरगुती २८,६३८ तसेच हरतालिका ५५४ अशा एकूण ३६,१२८ गणेश मुर्तीसह गौरींचे विसर्जन करण्यात आले.

कुबुद्धिचे व्हावे विसर्जन : फडणवीसांचा विरोधकांना चिमटा

गिरगाव चौपाटीवर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी येत असतात. बाप्पाला निरोप देण्यासह भक्तांचा उत्साह वाढीसाठी गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेसह पोलीस यंत्रणेचे कौतुक केले. तसेच काही लोक नेहमीच टीका करत असतात, अशा लोकांना सबुद्धी द्यावी आणि कुबुद्धिचे विसर्जन व्हावे असा चिमटा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना काढला.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे

एकनाथ शिंदे गिरगाव चौपाटीवर बाप्पाला निरोप देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी बाप्पांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागांसाठी मदतीचा हात पुढे केला असून शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

निरोपासाठी मुंबापुरी रस्त्यावर :

गेले १२ दिवस मुंबईतील वातावरण भक्तिमय झाले होते. शुक्रवारी सकाळपासून १२ दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबापुरी रस्त्यावर उतरली होती. मुंबईतील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या गणेश गल्लीतील बाप्पाची मिरवणूक निघाल्यानंतर लालबागच्या राजाची मिरवणूक निघाली. १२ दिवसांत लालबागच्या राजाचे दर्शन घेणे शक्य झाले नाही, लालबागच्या राजाच्या सुबक, आकर्षक, उंच गणेश मूर्तीची एक झलक डोळ्यात सामावून घेणे, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीच्या क्षणाची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी रस्त्यांवर व गिरगाव चौपाटीवर उसळली होती.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आजचे राशिभविष्य, २७ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

डाएटवाल्यांसाठी खास! नाश्त्यात बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की; १० मिनिटांत होईल तयार

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

'लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी एकत्र या'; SIR विरोधात ४ ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास