Mumbai : मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण नको! समन्वय समितीचे मंडळांना आवाहन 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण नको! समन्वय समितीचे मंडळांना आवाहन

गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेत कायद्याने निर्धारित ध्वनिमर्यादा आणि परवानगीच्या अटींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सार्वजनिक गणेश मंडळांना केले आहे.

Swapnil S

मुंबई : गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिमर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेत कायद्याने निर्धारित ध्वनिमर्यादा आणि परवानगीच्या अटींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सार्वजनिक गणेश मंडळांना केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाची दखल घेतली असून या पार्श्वभूमीवर, समितीने मंडळांना विसर्जन मिरवणुका शिस्तबद्ध आणि सुरक्षितपणे पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासन, पोलीस, महापालिका आणि समन्वय समितीच्या आवाहनांना सहकार्य केले. आता विसर्जनाच्या अंतिम टप्प्यातही हीच शिस्त व सामाजिक बांधिलकी कायम ठेवावी, असे समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहीबावकर यांनी म्हटले आहे.

ज्येष्ठ, मुलांची काळजी घ्या!

उच्च न्यायालयाने ध्वनीची पातळी मोजणे तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याबाबत भूमिका घेतली आहे. त्यामुळे मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि अन्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही समितीने केल्या आहेत.

शिस्त राखा

विसर्जन मिरवणुकीत गर्दीचे नियोजन, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, विद्युत रोषणाई व वायरची सुरक्षितता तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विसर्जनस्थळीही शिस्त राखावी आणि सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहिबावकर आणि प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांनी केले आहे.

भक्ती असू द्या, पण बेभानपणा नको!

फटाक्यांमुळे होणारे ध्वनी, वायुप्रदूषण व मिरवणुकांमधील आवाजाबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. त्यामुळे ‘भक्ती असावी, पण बेभानपणा नको; उत्साह असावा, अतिरेक नको; संगीत असू द्या, ध्वनिप्रदूषण नको; मिरवणूक असू द्या, पण वाहतुकीला अडथळा नको,’ असा संदेश समितीने दिला.

विसर्जन मिरवणुकीसाठी समितीच्या सूचना

  • कायद्याने निर्धारित ध्वनीमर्यादेचे काटेकोर पालन करा.

  • परवानगीच्या अटी आणि लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करा.

  • मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व रुग्णांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्या.

  • मिरवणुकीत गर्दीचे योग्य नियोजन करा.

  • महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या.

  • विद्युत रोषणाई व वायरची सुरक्षितता तपासा.

  • मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घ्या.

  • विसर्जनस्थळी शिस्त आणि सुरक्षितता कायम ठेवा.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बँका येत्या रविवारीही राहणार सुरू; अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णय

'सुपर एल निनो'मुळे साडेचार लाख लोकांना मृत्यूचा धोका; जगभरात भारतासह आशियाई देशांना तीव्र उष्णतेचा बसणार फटका

Mumbai : एसी, प्रथम श्रेणी पास महागणार! दोन हजारांवरील UPI व्यवहारांवर ५.९० रुपये अतिरिक्त शुल्क लागू होणार

भाजपने भाकरी फिरवली, संघटनेत खांदेपालट

Mumbai : वीजबिल थकबाकीदारांना 'बेस्ट दिलासा'; अभय योजनेला मंजुरी, सोळा हजार ग्राहकांना होणार लाभ