Mumbai Ganeshotsav 2026 : बाप्पासाठी चक्क रेल्वे; मूषक झाले प्रवासी, सोशल मीडियावर Video व्हायरल (Photo-Instagram)
मुंबई

Mumbai Ganeshotsav 2026 : बाप्पासाठी चक्क रेल्वे; मूषक झाले प्रवासी, सोशल मीडियावर Video व्हायरल

सध्या अनेक मोठ्या गणेश मंडळांकडून भव्य आणि आकर्षक देखावे साकारले जात असताना, शिवकृपा मित्र मंडळाने मात्र साधी आणि मनमोहक गणेशमूर्ती ठेवत संकल्पनेवर भर दिला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : मुंबईकर सध्या गणेशोत्सवाच्या भक्तिरंगात रंगून गेले आहेत. शहरातील विविध गणेश मंडळांकडून साकारण्यात आलेले आकर्षक देखावे आणि गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याचदरम्यान, मालाड पूर्व येथील रेल्वेच्या संकल्पनेवर साकारण्यात आलेला अनोखा गणेशोत्सव देखावा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या देखाव्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांकडूनही त्याचे कौतुक केले जात आहे.

मालाड पूर्वेतील डायमंड मार्केटजवळ शिवकृपा मित्र मंडळाने हा अनोखा देखावा साकारला आहे. बाल गणेश आणि त्यांचे कुटुंब रेल्वेने प्रवास करत असल्याची संकल्पना या देखाव्यात मांडण्यात आली आहे. देवी पार्वती, भगवान शंकर, नंदी आणि बाल गणेश यांचा रेल्वे प्रवास दाखवण्यासाठी रेल्वेच्या डब्याची जवळपास हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

पार्वतीच्या कुशीत बाल गणेश

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये देवी पार्वतीच्या कुशीत विराजमान असलेले बाल गणेश पाहायला मिळतात. दोन्ही बाजूंना भारतीय प्रवासी रेल्वेतील आसनांप्रमाणे रचना करण्यात आली आहे. भगवान शंकर आणि नंदीही कुटुंबासोबत रेल्वेने प्रवास करत असल्याप्रमाणे बसलेले दिसतात.

सध्या अनेक मोठ्या गणेश मंडळांकडून भव्य आणि आकर्षक देखावे साकारले जात असताना, शिवकृपा मित्र मंडळाने मात्र साधी आणि मनमोहक गणेशमूर्ती ठेवत संकल्पनेवर भर दिला आहे. रेल्वेच्या डब्याची केलेली वास्तवदर्शी मांडणी आणि त्यातील बारकावे यामुळे हा देखावा विशेष ठरत आहे.

मूषकही झाले रेल्वेतील प्रवासी

या देखाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध मूषकांना चक्क रेल्वेतील प्रवाशांच्या रूपात दाखवण्यात आले आहे. काही मूषक बोर्ड गेम खेळताना दिसतात, तर काही भक्तिगीते ऐकण्यात रमले आहेत. एका मूषकाच्या हातात वर्तमानपत्रही पाहायला मिळते. प्रवाशांसारखे फेस्टीव लूकमध्ये मूषक दिसत आहेत.

रेल्वे प्रवासातील दैनंदिन हालचाली आणि वातावरणाची हुबेहूब नक्कल करण्याचा प्रयत्न या सजावटीत करण्यात आला आहे. त्यामुळे हा देखावा पाहणाऱ्या भाविकांना जणू आपणही रेल्वेच्या डब्यातील प्रवासाचा अनुभव घेत असल्याचा भास होतो.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून कौतुक

शिवकृपा मित्र मंडळाच्या या संकल्पनेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना, "मोठमोठे विचित्र चेहरे आणि कोणताही दिखावा नाही. फक्त साधी, निर्मळ भक्ती आणि भावना. सगळंच सुंदर आहे," असे म्हटले.

तर दुसऱ्या एका युजरने "हे सगळे कैलासाला जात आहेत," अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली. आणखी एका नेटकऱ्याने "मुंबईची जीवनवाहिनी आणि आमचे जीवनरक्षक," अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

भव्यतेपेक्षा कल्पकता आणि भक्तीला प्राधान्य देणारा हा रेल्वे थीमचा देखावा सध्या भाविकांसह सोशल मीडिया युजर्सचेही लक्ष वेधून घेत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : चार हॉटेल्सवर एफडीएची कारवाई; कॅफे मोंडेगर, महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित

PMLA प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; ED कडून प्रकरणांचा तपशील मागवला

ठाण्यात आस्थापनांची परवाना नूतनीकरणाकडे पाठ; परवाना विभागाकडून मागील १८ महिन्यांत १,१८२ नोटिसा, अवघ्या ४३४ चे नूतनीकरण

साखर कारखान्यांना ७३८ कोटींचे व्याज अनुदान; सहकारी साखर कारखान्यांसाठी सुलभ कर्ज योजना, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

Mumbai : शंख-शिंपल्यांपासून साकारली ९.५ फुटांची इको-फ्रेंडली गणेशमूर्ती; मालाडच्या श्री साई दर्शन मित्रमंडळाचे १७ व्या वर्षात पदार्पण