मुंबई : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरात घुसखोरी केलेल्या १४ पाकिस्तानी अतिरेक्यांमार्फत ४०० किलो आरडीएक्सच्या सहाय्याने ३४ मानवी बॉम्ब पेरण्यात आले असून शहरात मोठ्या प्रमाणावर घातपात घडवण्यात येणार आहे, असा धमकीचा संदेश 'लष्कर ए जिहादी' या कथित संघटनेने मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवल्याने मुंबई पोलिसांकडून 'हाय अलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई शहरात पाकिस्तानी दहशतवादी शिरले असून त्यांनी ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्ब पेरले असल्याने होणाऱ्या बॉम्बस्फोटांमुळे एक कोटी लोक मृत्युमुखी पडतील, असा दावा या अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या संदेशात करण्यात आला आहे. हा संदेश कुठून पाठवण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, या प्रकाराची दखल घेत 'हाय अलर्ट'चा इशारा देण्यात आला असून केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यभरात सावधगिरी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दहशतवादी हल्ल्याची प्रत्येक शक्यता गृहीत धरून अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
या संदेशाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील ठिकाणी तसेच गणेश विसर्जनाच्या गर्दीच्या ठिकाणी विशेष सतर्कता बाळगण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी मुंबई पोलीस दलाला दिले आहेत. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यापूर्वी पोलीस महासंचालकांच्या कुलाबा येथील कार्यालयातील नियंत्रण कक्षात ऑगस्ट महिन्यात एक निनावी दूरध्वनी आला होता. मुंबईतील लोकलमध्ये बॉम्ब ठेवला असून स्फोट घडविण्यात येणार असल्याची माहिती फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने दिली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील शाळा, शासकीय कार्यालये, दूतावास आदी बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या येत होत्या. त्यानंतर वरळीतील फोर सिझन हॉटेललाही आरडीएक्स व आयईडीद्वारे बॉम्बस्फोट घडविण्यात येणार असल्याच्या धमकीचा ई-मेल आला होता.
आरोपीचा शोध सुरू
गणेश विसर्जनाच्या एक दिवस आधी मिळालेल्या या धमकीच्या मेसेजमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई पोलिसांनी शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासोबतच धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता मुंबई वाहतूक पोलिसांना आलेला मेसेजची खातरजमा पोलिसांकडून केली जात आहे.