मुंबईत घरांच्या खरेदीत वाढ; ऑगस्टमध्ये १२,५०० मालमत्तांची नोंदणी, स्टॅम्प ड्युटीतून १,१२३ कोटींचा महसूल संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबईत घरांच्या खरेदीत वाढ; ऑगस्टमध्ये १२,५०० मालमत्तांची नोंदणी, स्टॅम्प ड्युटीतून १,१२३ कोटींचा महसूल

मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात यंदाच्या ऑगस्ट महिन्यात जोरदार तेजी पाहायला मिळत असून, महिनाभरात तब्बल १२,५०३ मालमत्तांची नोंदणी होण्याचा अंदाज ‘नाइट फ्रँक इंडिया’च्या विश्लेषणातून व्यक्त करण्यात आला आहे.

प्रतिनिधी

स्वीटी भागवत/मुंबई :

मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रात यंदाच्या ऑगस्ट महिन्यात जोरदार तेजी पाहायला मिळत असून, महिनाभरात तब्बल १२,५०३ मालमत्तांची नोंदणी होण्याचा अंदाज ‘नाइट फ्रँक इंडिया’च्या विश्लेषणातून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात ११ टक्क्यांची वाढ झाली असून, मागील १४ वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील ही सर्वोच्च नोंदणी ठरणार आहे.

मालमत्ता नोंदणीच्या या तेजीमुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत ऑगस्ट महिन्यात सुमारे १,१२३ कोटी रुपयांचा महसूल स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून जमा होण्याचा अंदाज आहे, जो गेल्या वर्षापेक्षा १२ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२५ मध्ये ११,२३० मालमत्तांची नोंदणी झाली होती आणि १,००० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

मागील महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये मालमत्ता नोंदणीत १० टक्के आणि महसुलात ११ टक्क्यांची घट झाली आहे. जुलै महिन्यात १३,८२४ मालमत्तांची नोंदणी होऊन १,२५५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. मात्र, वर्षानुवर्षाची तुलना करता घरांची मागणी मजबूत असल्याचे स्पष्ट होते. ‘नाइट फ्रँक इंडिया’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले की, मासिक आकडेवारीत काही प्रमाणात घट दिसत असली तरी वार्षिक वाढीचा दर गृहनिर्माण क्षेत्रातील भक्कम मागणी अधोरेखित करतो.

मागील एका दशकातील आकडेवारी पाहता मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्राचा मोठा विस्तार झाला आहे. ऑगस्ट २०१३ मध्ये मुंबईत अवघ्या ४,७७९ मालमत्तांची नोंदणी झाली होती आणि २३९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. ऑगस्ट २०२३ मध्ये पहिल्यांदाच नोंदणीचा आकडा १० हजार पार (१०,९०२) गेला. ऑगस्ट २०२४ मध्ये ही संख्या ११,६३१ होती.

‘नारडेको महाराष्ट्र’चे अध्यक्ष आणि ‘सृष्टी ग्रुप’चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक कमलेश ठाकूर यांनी सांगितले की, “मजबूत आर्थिक गती आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे मुंबईतील गृहनिर्माण क्षेत्रावर ग्राहकांचा विश्वास कायम आहे. आगामी सणासुदीच्या काळात ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.”

‘द गार्डियन्स रिअल इस्टेट ॲडव्हायझरी’चे सह-संस्थापक राम नाईक यांनी नमूद केले की, “सातत्यपूर्ण होणारे मोठे व्यवहार हेच दर्शवतात की शहरी खरेदीदारांसाठी मालमत्ता खरेदी ही सर्वोच्च प्राथमिकता आहे.”

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई