मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रिझर्व्ह बँकेने केलेल्या नियमित लेखापरीक्षण दरम्यान १२२ कोटी रुपयांची तफावत असल्याचे स्पष्ट झाले आणि सहकारी बँकेच्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जबाबातच घोटाळा झाल्याची कबुली समोर आली.
आरबीआयच्या निर्बंधानंतर ग्राहकांच्या गर्दीमुळे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेबाहेर पोलिसांची व्हॅन तैनात करण्यात आली होती. तपासादरम्यान शाखांमध्ये रकमेचे गणित जुळत नसल्याचे समोर आले. अधिक खोलात चौकशी केल्यानंतर बँकेचा ज्येष्ठ अधिकारी हितेश मेहता याने आपण वर्ष २०२० मध्ये (कोविड-१९ काळात) निधी हडपल्याची कबुली दिली.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या जबाबानुसार, आरबीआय अधिकाऱ्यांनी मुंबईतील प्रभादेवीतील मुख्यालय आणि गोरेगाव शाखेत तपासणी करताना १२२ कोटी रकमेचा हिशेब लागत नव्हता. १२ फेब्रुवारी रोजी प्रभादेवी कार्यालयात आरबीआयचे उपमहाव्यवस्थापक रवींद्रन आणि अधिकारी संजय कुमार नियमित तपासणीसाठी आले. बँकेचे महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक आणि आरोपी हितेश मेहता (जीएम व हेड ऑफ अकाऊंट्स) हेदेखील उपस्थित होते.
बँकेच्या तिसऱ्या मजल्यावरील तिजोरीतील रोकड मोजल्यावर रकमेत तफावत उघड झाली. दुसऱ्या पथकाने गोरेगाव शाखेतील तिजोरीची तपासणी केली. बँकेच्या नोंदी आणि प्रत्यक्ष रोकड यामध्ये मोठा फरक आढळला.
आरबीआय अधिकाऱ्यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून सांगितले की, १२२ कोटींची रोकड गायब आहे आणि गोरेगाव शाखेतही अधिकची तफावत आढळली आहे. रकमेच्या या फरकाचा खुलासा न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी न्यु इंडिया सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना दिला.
न्यु इंडिया को-आप बँकेच्या एका कर्मचाऱ्याने नाव जाहीर न करता प्रसारमाध्यमाला सांगितले की, “आरबीआय अधिकाऱ्यांनी आम्हाला बोलावले आणि सांगितले की बँकेच्या नोंदी आणि प्रत्यक्ष रोकड यामध्ये मोठी तफावत आहे. १२२ कोटींची रोकड तिजोरीतून गायब आहे. याचा आम्हा सर्वांना धक्का बसला. काही वेळ काय बोलावे हेच कळेना. अधिकाऱ्यांनी आम्हाला ईमेलद्वारे माहिती देण्याची संधी दिली.”
आरबीआय पथकाने आरोपी हितेश मेहताला खासगी चौकशीसाठी बँक शाखेतील वरच्या खोलीत बोलावले. त्यानंतर त्याने बँकेची रोकड हडपल्याची कबुली दिली. “मी ओळखीच्या लोकांना हे पैसे दिले. कोविड-१९ साथ आजाराच्या काळातच मी पैसे परस्पर वळते करायला सुरुवात केली होती,” असे मेहताने चौकशीत सांगितले.
दादर पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणात तक्रार नोंदवली. नंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. शनिवारी तपास अधिकाऱ्यांनी दहिसरमधील मेहताच्या घराची झडती घेऊन त्याला अटक केली आणि रविवारी याच प्रकरणात धर्मेश पौन याला अटक करण्यात आली.