जेजे, माया ब्लड सेंटरचा रक्तपेढी परवाना रद्द; नियमांचे उल्लंघन केल्याने FDA ने केली कारवाई 
मुंबई

Mumbai : जेजे, माया ब्लड सेंटरचा रक्तपेढी परवाना रद्द; नियमांचे उल्लंघन केल्याने FDA ने केली कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए), मुंबईतील ‘सर जेजे मेट्रोपॉलिटन ब्लड सेंटर' आणि बदलापूर येथील ‘माया ब्लड सेंटर’ या दोन्ही रक्तपेढ्यांचे काम तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले. रक्तपेढीच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

अमित श्रीवास्तव

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए), मुंबईतील ‘सर जेजे मेट्रोपॉलिटन ब्लड सेंटर' आणि बदलापूर येथील ‘माया ब्लड सेंटर’ या दोन्ही रक्तपेढ्यांचे काम तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले. रक्तपेढीच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई २२ ते २४ जून २०२६ दरम्यान एफडीए महाराष्ट्र आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (सीडीएससीओ) यांच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या संयुक्त तपासणीनंतर करण्यात आली. या तपासणीत ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट १९४०’ आणि ‘ड्रग्ज रूल्स, १९४५’ चे, विशेषतः रक्तपेढ्यांच्या कामकाजाचे नियमन करणाऱ्या ‘शेड्यूल एफ, पार्ट XII-B' मधील तरतुदींचे अनेकदा उल्लंघन झाल्याचे आढळले.

जेजे रुग्णालयाच्या आवारात असलेल्या या रक्तपेढीत तपासणीदरम्यान रक्ताची साठवणूक आणि व्यवस्थापनात त्रूटी आढळल्या. तसेच, मुदत संपलेल्या रक्ताच्या पिशव्या हाताळण्यात निष्काळजीपणा, जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची अपुरी पद्धत, गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीतील अपयश, उपकरणांमधील तांत्रिक दोष आणि रक्त घटक तयार करण्याच्या युनिटमध्ये निर्जंतुकीकरणाचा अभाव असल्याचे दिसून आले.

माया ब्लड सेंटर, बदलापूर येथील तपासणीत रक्तदान शिबिरांमधून गोळा केलेल्या रक्ताच्या वाहतुकीची नोंद नसणे, रक्ताच्या पिशव्यांच्या ट्रॅसेबिलिटीमध्ये त्रुटी, रक्त संक्रमण अधिकारी आणि इतर अनिवार्य तांत्रिक कर्मचारी नसणे, उपकरणांची मुदत संपणे, गुणवत्ता नियंत्रण चाचण्यांचा अभाव, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनातील अनियमितता आणि रक्तदान शिबिरांसाठी आवश्यक असलेल्या मंजुरी व कागदपत्रांची कमतरता असल्याचे उघड झाले.

संयुक्त तपासणी पथकाच्या मते, या त्रुटींमुळे रक्त आणि रक्त घटकांची सुरक्षितता, गुणवत्ता आणि परिणामकारकता धोक्यात येऊ शकते, ज्यामुळे रक्तदाते आणि रुग्ण दोघांनाही धोका निर्माण होऊ शकतो. तसेच, अशा प्रकारच्या त्रुटींमुळे ऐच्छिक रक्तदान प्रणालीवरील लोकांचा विश्वास कमी होऊ शकतो, अशी चिंताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व रक्तपेढ्यांना कायदेशीर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले असून, तसे न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तत्काळ बंदीचे आदेश

सार्वजनिक आरोग्य आणि रुग्ण सुरक्षिततेच्या दृष्टीने, एफडीएच्या परवाना प्राधिकरणाने दोन्ही रक्तपेढ्यांना पुढील आदेशापर्यंत रक्त संकलन, घटक निर्मिती, चाचणी, साठवणूक, वितरण, विक्री आणि रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासह सर्व कामे तत्काळ बंदीचे आदेश दिले.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पोलिसांच्या मते चेतन हाच सूत्रधार; 'सियाला केतनविरुद्ध भडकवले, शेवटचा धक्काही त्यानेच दिला'

राज्यात पावसाची तूर्त विश्रांती; जुलैपासून पुन्हा पडणार; हवामान खात्याचा अंदाज

अखेर अटक व राजीनामे! राम मंदिर अपहारप्रकरणी ८ अटकेत; चंपत राय यांचा राजीनामा

MPSC च्या पूर्वपरीक्षा आता संगणकावर; वर्षातून दोन ते तीन वेळा परीक्षा घेण्याची घोषणा

'सिंदूर'मधील ६ शहिदांची नावे प्रथमच जाहीर