मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या लोकप्रिय ‘के. रुस्तम’ आयस्क्रीम पार्लरचा परवाना महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) निलंबित केला आहे. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी तसेच मुदत संपलेले कृत्रिम फ्लेव्हर्स साठवून ठेवल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रसिद्ध आयस्क्रीम पार्लरमध्ये अचानक करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान गंभीर अस्वच्छता आढळून आली. पार्लरच्या आवारात जिवंत उंदीर आणि माश्यांचा सुळसुळाट असल्याचे एफडीआयने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
नियमांचे उल्लंघन
एफडीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तपासणी दरम्यान अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत रुस्तम आयस्क्रीम पार्लरचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच, घेतलेल्या अन्नपदार्थांच्या नमुन्यांचा प्रयोगशाळा अहवाल येईपर्यंत हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांना सुरक्षित आणि सकस अन्न मिळावे यासाठी एफडीआय आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांची तपासणी तीव्र करण्यात आली आहे.
कोल्ड चेनमध्येही त्रुटी
एफडीआयने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी आयस्क्रीमचे नमुने जप्त केले आहेत. दरम्यान, यापूर्वीच्या एका बाह्य प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, या आयस्क्रीममध्ये फॅट्सचे प्रमाण अवघे ७.९४ टक्के आढळले होते.