कळवा कारशेडजवळ प्रवाशांचा धोकादायक प्रवास; लोकल थांबताच धावत करतात लोकलमध्ये प्रवेश, मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन 
मुंबई

कळवा कारशेडजवळ प्रवाशांचा धोकादायक प्रवास; लोकल थांबताच धावत करतात लोकलमध्ये प्रवेश, मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

कळवा कारशेड परिसरात सिग्नलवर थांबणाऱ्या रिकाम्या लोकलमध्ये अनधिकृतपणे चढणाऱ्या प्रवाशांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी हे गेट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरूनच लोकलमध्ये चढण्याचे आणि उतरण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Swapnil S

मुंबई : कळवा कारशेड परिसरात सिग्नलवर थांबणाऱ्या रिकाम्या लोकलमध्ये अनधिकृतपणे चढणाऱ्या प्रवाशांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी हे गेट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच प्रवाशांना रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरूनच लोकलमध्ये चढण्याचे आणि उतरण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दररोज सकाळी ८ ते ८.३० या वेळेत कळवा कारशेडमधून सुटणारी रिकामी लोकल मुख्य प्रवेशद्वाराजवळील केबिन परिसरात सिग्नलमुळे थांबते. यावेळी काही प्रवासी गेटमधून अनधिकृतपणे आत प्रवेश करून सिग्नलजवळच लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. ही कृती अत्यंत धोकादायक असून सिग्नल मिळाल्यानंतर गाडी अचानक सुरू झाल्यास गंभीर अपघात होऊन जीवितहानी किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागांच्या समन्वयाने हे गेट कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, विविध सुरक्षा निकषांचा आढावा घेऊन सिग्नलवर गाडी थांबण्याची आवश्यकता कमी करण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी केवळ अधिकृत प्लॅटफॉर्मवरूनच ट्रेनमध्ये चढावे-उतरावे, रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा सूचनांचे पालन करावे आणि कोणत्याही मदतीसाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ किंवा जवळील रेल्वे कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

कठोर कायदेशीर कारवाईचा इशारा

रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, “कारशेड, यार्ड, सिग्नल किंवा प्रवाशांसाठी अधिकृत नसलेल्या कोणत्याही ठिकाणाहून ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे हे रेल्वे कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारे अनधिकृत प्रवेश करणाऱ्या किंवा ट्रेनमध्ये चढणाऱ्या-उतरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.”

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी