मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथील सिद्धीविनायक 'ए' को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि बिल्डर यांच्यात ७ वर्षांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने गृहनिर्माण संस्थेला मोठा दिलासा देतानाच बिल्डरला दोन महिन्यांच्या आत सोसायटीच्या नावावर कन्व्हेयन्स डीड नोंदवून देण्याचे सक्त आदेश दिले. न्यायाधीश एम. ए. देशमुख यांनी हा निकाल दिला.
कांदिवली येथील इराणी वाडी रोड नंबर ४ वरील 'सिद्धी विनायक' सातमजली इमारतीची निर्मिती मेसर्स विजय डेव्हलपर्स या भागीदारी संस्थेने केली होती.
त्यानंतर २७ मे २००९ रोजी ४७ सभासदांनी मिळून सिद्धिविनायक ए को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची नोंदणी केली. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स अॅक्ट आणि करारातील अटींनुसार सोसायटी स्थापन झाल्यानंतर बिल्डरने जमिनीचे हक्क सोसायटीच्या नावावर करणे बंधनकारक होते. मात्र, बिल्डरने प्रशासकीय अडचणींचे कारण पुढे करत कन्व्हेयन्स डीड करून देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे हतबल झालेल्या सोसायटीने २०१८ मध्ये न्यायालयात धाव घेतली होती. दीर्घकाळ चाललेल्या खटल्यात न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतले.
बिल्डरने आपल्या बचावासाठी न्यायालयात कोणतीही तोंडी किंवा लेखी साक्ष सादर केली नाही. त्याची नोंद घेत न्यायालयाने सोसायटीच्या बाजूने निकाल दिला. बिल्डरने दोन महिन्यांच्या आत सोसायटीच्या कायदेशीर हिश्श्याची जमीन आणि सामायिक क्षेत्रांचे हक्क हस्तांतरित करून द्यावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.