Mumbai : पोयसर नदीजवळ ४२० मीटर लांब संरक्षक भिंत; पावसाळ्यात पुराचा धोका टळणार  संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : पोयसर नदीजवळ ४२० मीटर लांब संरक्षक भिंत; पावसाळ्यात पुराचा धोका टळणार

कांदिवली पूर्वेकडील हनुमाननगर परिसराला पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीपासून दिलासा मिळणार आहे. कांदिवलीतील पोयसर नदीजवळ ४२० लांब मीटर संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : कांदिवली पूर्वेकडील हनुमाननगर परिसराला पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीपासून दिलासा मिळणार आहे. कांदिवलीतील पोयसर नदीजवळ ४२० लांब मीटर संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी मुंबई महापालिका ९ कोटी ८ लाख ७ हजार रुपये खर्च करणार आहे.

कांदिवली पूर्वेकडील हनुमाननगर परिसरात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरसदृश स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोयसर नदीचे मजबुतीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे. कुरार कल्व्हर्ट ते पश्चिम रेल्वे या दरम्यान नदीलगत सुमारे ४२० मीटर लांबीची आरसीसी संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.

आर/दक्षिण विभागातील हनुमाननगर परिसर सखल भागात असल्याने अतिवृष्टीच्या काळात पोयसर नदीचे पाणी परिसरातील वस्त्यांमध्ये शिरून पूरसदृश स्थिती निर्माण होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला होता. नदीलगतच्या बाधित झोपडीधारकांचे पुनर्वसन झाल्यानंतर आता संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

कमी दराने निविदा सादर

या कामासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाने ८.१६ कोटी रुपयांचा कार्यालयीन अंदाज तयार केला होता. ६ एप्रिल २०२६ रोजी ई-निविदा मागवण्यात आल्यानंतर पाच निविदा प्राप्त झाल्या. त्यामध्ये मे. प्रलिता इन्फ्राप्रोजेक्ट्स यांनी सर्वात कमी म्हणजे अंदाजित दरापेक्षा २९.२९ टक्के कमी दराने निविदा सादर केली. त्यांची निविदा रक्कम सुमारे ५.७७ कोटी रुपये आहे.

असा असेल खर्च

कंत्राटदाराच्या कामाचा खर्च, जीएसटी, विविध आकार, किंमत फेरफार तरतूद आणि उपयोगिता सेवा स्थलांतराचा खर्च विचारात घेऊन एकूण ९ कोटी ८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रलिता इन्फ्राप्रोजेक्ट्स यांनी यापूर्वी गोरेगाव पश्चिम येथील उन्नतनगर महापालिका शाळेची दुरुस्ती आणि मरोळ परिरक्षण कार्यालयाची दुरुस्ती ही कामे पूर्ण केली आहेत. याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai: २० ‌विभागांचा निधी दिवाबत्तीसाठी; रस्त्यांवरील दिवाबत्तीची ५४.८० कोटींची थकबाकी, चालू आर्थिक वर्षातील तरतूदही अपुरी

वेतनश्रेणीच्या मागणीसाठी न्यायालयीन कामकाज ठप्प; संपात राज्यातील सुमारे ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी सहभागी

भटक्या कुत्र्यांवर उपाययोजना करा! न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश

Thane : 'बाळासाहेब असते, तर त्याच रात्री न्याय मिळाला असता'; कापूरबावडी पोलीस ठाण्याबाहेर बॅनर

ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सॲप खाते हॅक; स्टेट्सवर २० अश्लील चित्रफिती