Mumbai : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची सोनसाखळी लंपास; चोरट्याचं कृत्य सीसीटीव्हीत कैद (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
मुंबई

Mumbai : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची सोनसाखळी लंपास; चोरट्याचं कृत्य सीसीटीव्हीत कैद

वृद्ध महिला बाहेरून घरी परतल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडत होती. त्याचवेळी...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : मुंबईतील कांदिवली येथील उमंग अपार्टमेंटमध्ये वृद्ध महिलेची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना समोर आली आहे. ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ ते ९.३० च्या सुमारास एका तरुणाने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेशी संवाद साधला. त्यानंतर संधी साधून तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे.

पत्ता विचारण्याचा बहाणा करून साधला डाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम येथील उमंग अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. वृद्ध महिला बाहेरून घरी परतल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील आपल्या फ्लॅटचा दरवाजा उघडत होती. त्याचवेळी हिरव्या रंगाची टोपी, निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पाठीवर बॅग असलेला एक तरुण तिच्याजवळ आला. त्याने कागदावर लिहिलेला पत्ता दाखवत जवळच राहणाऱ्या एका व्यक्तीचा पत्ता विचारण्याचे नाटक केले.

महिलेने त्याला संबंधित व्यक्तीचा पत्ता समजावून सांगण्यासाठी वरच्या मजल्याच्या दिशेने बोट दाखवले. त्यानंतर तरुण तेथून निघून जात असल्याचे भासवू लागला. मात्र, काही क्षणांतच तो पुन्हा मागे फिरला आणि महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळून गेला.

सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचा फायदा?

मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी सोसायटीचा सुरक्षारक्षक आपल्या नेमून दिलेल्या जागेवर उपस्थित नव्हता. तो सोसायटीतील अन्य एका रहिवाशाला वाहन पार्क करण्यासाठी मदत करत होता. याचदरम्यान तरुणाने सोसायटीत प्रवेश करून वृद्ध महिलेला लक्ष्य केले.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे वृद्ध महिला घाबरल्याचे सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. कांदिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ७४ वर्षांच्या ‘म्हातारीच्या बुटा’ला व्हिंटेज लुक! लवकरच बच्चेकंपनीसाठी खुला होणार

Bengaluru Mass Murder : कॅब चालकाचे भयंकर कृत्य; पत्नीसह सासरच्या सहा जणांची वरवंट्याने ठेचून निर्घृण हत्या

Mumbai : काँक्रीटीकरणासाठी ८,६१४ कोटी; तिसऱ्या टप्प्यात ३११ किमीचे रस्ते होणार सिमेंट काँक्रीटचे

Mumbai : बेस्टच्या ४४०० निवृत्त कर्मचाऱ्यांची ‘काळी दिवाळी’; थकबाकीसाठी आझाद मैदानात आंदोलन

Mumbai : डोंगरीतील लॅम्बट इमारत जप्त; ED ची कारवाई; दाऊदच्या नावे धमकी देत मालमत्ता सलीम फ्रूटच्या पत्नीच्या नावे केल्याचा आरोप