पूनम अपराज/मुंबई
गणेशोत्सवाच्या काळात लालबाग परिसरात दर्शनासाठी होणाऱ्या अलोट गर्दीचा फायदा घेत भाविकांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा काळाचौकी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. १४ सप्टेंबरला लालबाग परिसरात सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल चोरीच्या अनेक घटना समोर आल्या. या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथून आलेल्या दोन चोरट्यांना अटक केली आहे.
सुरक्षारक्षकाचा मोबाईल आणि रोख रक्कम पळवून नेणाऱ्या या दोन चोरट्यांना भाविकांनी पाठलाग करून पकडले. आरिफ साकसेनसिंह गुजर (२४) आणि सोमनाथ सामानसिंह राठोड (२३, दोघे रा. इंदूर, मध्य प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीत आणखी सदस्यांचा समावेश आहे का, याचा शोध काळाचौकी पोलीस घेत आहेत.
रांगेत दागिने लांबवले
लालबागच्या रहिवासी वर्षा भोपळे (६७) या १४ सप्टेंबरला सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील कुबल मसाल्याजवळ दर्शनाच्या रांगेत उभ्या होत्या. गर्दीत साडी नीट करत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रुपये किमतीचे १० ग्रॅमचे मंगळसूत्र गायब झाले. शोध घेऊनही दागिना न सापडल्याने त्यांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याच वेळी सायन-कोळीवाडा येथील रहिवासी धनंजय बालसराफ (४९) यांनीही तक्रार दिली की, त्याच दर्शनाच्या रांगेत उभ्या असताना चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ९० हजाराची सोन्याची साखळी चोरली.
सुरक्षारक्षकाचा आरडाओरडा; जमावाने पकडले
दुसरी घटना दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मालाड येथील सुरक्षारक्षक मायकेल नाडर (२८) रांगेत उभे असताना दोन्ही आरोपींनी त्यांच्या खिशातील २५ हजार रुपयांचा मोबाईल आणि २,३०० रुपयांची रोख रक्कम काढली. चोरी झाल्याचे लक्षात येताच नाडर यांनी आरडाओरडा केला. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन्ही आरोपींना भाविकांनी पाठलाग करून पकडले आणि चोप दिला. गस्तीवर असलेल्या साध्या वेषातील पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.