श्रेया जाचक
मुंबई : खांद्यावर तिरंगा, हातात निवडणूक आयोगावर टीका करणारे उपरोधिक फलक, या वातावरणात शुक्रवारी आझाद मैदानावर शुक्रवारी पार पडलेल्या ‘सीजेपी’च्या ‘लहरा दो तिरंगा’ या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळालेला दिसला.
सीजेपीच्या या आंदोलनाला अपेक्षेपेक्षा मर्यादित उपस्थिती होती. तरीही नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन अटकेत असलेल्या पक्षाच्या नेत्यांना पाठिंबा दर्शवला आणि लोकशाहीबाबतच्या आपल्या चिंता व्यक्त केल्या.
दिल्लीतील निदर्शनांच्या दरम्यान ‘सीजेपी’ संस्थापक अभिजित दीपके, प्रवक्ते सौरव दास आणि इतर काही सदस्यांच्या अटकेच्या निषेधार्थ सीजेपीने हे आंदोलन पुकारले होते. नागरिकांना आझाद मैदानावर तिरंग्यासह उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाने केले होते. आंदोलना दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, ‘आम्ही आमच्या देशाचा ध्वज फडकवू आणि आम्हाला कोणीही रोखू शकत नाही.’
तरुणांचा सहभाग लक्षणीय
आझाद मैदानावर अनेक आंदोलकांनी तिरंगा आपल्या पाठीवर बांधला होता, तर काहींनी दिवसभर तो हातात धरून फडकवला. या आंदोलनात तरुणांचा सहभाग लक्षणीय होता; अनेक तरुण कार्यकर्ते आणि राजकीय समर्थकांनी यात भाग घेतला. काही जण मुंबईच्या विविध भागांतून आले होते, तर काही दिल्लीहून या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले होते.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका करणारे फलकही दिसत होते. घोषणा आणि फलकांमधून निवडणूक याद्यांमधील बदलांबाबतचा आंदोलकांचा संताप आणि निवडणूक आयोगाकडून उत्तरदायित्वाची मागणी दिसून येत होती.
मतदान हा लोकशाहीचा कणा...
काही उपस्थितांच्या मते, हा प्रश्न केवळ सीजेपी नेत्यांच्या अटकेपुरता मर्यादित नव्हता. त्यांच्या मते, मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा कणा आहे आणि निवडणूक याद्यांतून नावे वगळली जाण्याबाबतच्या चिंतांचे निराकरण होणे आवश्यक आहे. आंदोलक शिखा दास म्हणाल्या, ‘हा लोकशाहीचा प्रश्न आहे. मतदान करणे हा आपला अधिकार आहे. जर निवडणूक याद्यांतून आमची नावेच काढून टाकली गेली, तर नागरिक म्हणून आमच्याकडे काहीही उरणार नाही. अशा परिस्थितीत आपण कोणालाही जबाबदार धरू शकणार नाही.’