अभिषेक पाठक/मुंबई
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीमध्ये प्रथमच स्वयंचलित दरवाजे असलेल्या ‘विना-वातानुकूलित’ (नॉन एसी) लोकलचे आगमन झाले आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून १२ डब्यांची ही ट्रेन सोमवारी संध्याकाळी कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. आता मध्य रेल्वेकडून या गाडीची हाय-स्पीड आणि वजन वाहून नेण्याची क्षमता चाचणीला लवकरच सुरुवात होणार आहे. मात्र या बंद दरवाज्यांच्या स्वयंचलित लोकलमुळे प्रवाशांचा जीव घुसमटणार, असे या लोकलकडे प्रथमदर्शनी पाहिल्यानंतर जाणवत आहे.
सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर, प्रवाशांसाठी ही ट्रेन बहुधा कमी गर्दीच्या नेरुळ-उरण मार्गावर चालवली जाण्याची शक्यता आहे. लोकलमधून पडण्याच्या वाढत्या दुर्घटना आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
जुन्या नॉन-एसी लोकलच्या तुलनेत या नवीन ट्रेनच्या रचनेत आणि क्षमतेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या गाडीत बसण्याची क्षमता थोडी कमी झाली असली (१,०२८ वरून १,००३), तरी एकूण प्रवासी क्षमता मात्र लक्षणीय वाढली आहे. उभ्याने प्रवास करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध करून दिल्यामुळे ही ट्रेन ३,६०० ऐवजी सुमारे ५,६०० प्रवाशांना वाहून नेऊ शकते.
या ट्रेनमध्ये प्रथम श्रेणीचे तीन ऐवजी चार डबे देण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी यामध्ये ‘अँटी-ड्रॅग’ दरवाजे, आग शोधणारी यंत्रणा आणि आपत्कालीन संप्रेषण युनिट्स बसवण्यात आली आहेत. प्रचंड गर्दीच्या वेळी व्हेंटिलेशन नेमके कसे काम करते, हे चाचण्यांनंतर स्पष्ट होईल, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिक सुरक्षित आणि हवेशीर
प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटू नये म्हणून व्हेंटिलेशन सिस्टीममध्ये सुधारणा करण्यात आली आहे. छतावरील प्रणाली आता प्रति तास १०,००० घनमीटर हवा आत ढकलते (पूर्वी ही क्षमता ६,००० होती). याशिवाय, १,९०० मिमीच्या रूंद सरकत्या खिडक्या आणि दरवाजांवर असलेल्या ‘लूव्हर्स’मुळे (बारीक छिद्रे) दरवाजे बंद असतानाही हवा खेळती राहील. मात्र बंदिस्त दरवाजांमुळे ऐन गर्दीच्या वेळी तसेच आत शिरण्यासाठी एक इंचही जागा नसताना प्रवाशांचा जीव अधिक घुसमटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे या लोकलला लोकांचा कितपत सकारात्मक प्रतिसाद मिळेल, हे पाहावे लागेल.
जुनी विरुद्ध नवीन लोकलची आकडेवारी
जुन्या आणि नव्या नॉन-एसी लोकलमधील तुलना पाहिली असता, नव्या गाडीत एकूण प्रवासी क्षमतेत मोठी वाढ करण्यात आली आहे. जुन्या लोकलमध्ये सुमारे ३,६०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता होती, ती नव्या लोकलमध्ये वाढवून सुमारे ५,६०० करण्यात आली आहे. बसण्याची क्षमता थोडी कमी होऊन १,०२८ वरून १,००३ इतकी झाली असली, तरी उभ्या प्रवाशांसाठी जागा वाढवण्यात आली आहे. उभ्या प्रवाशांची संख्या २,३३६ वरून ४,६६९ इतकी वाढली आहे. तसेच, डब्यांची रचना अधिक आधुनिक करण्यात आली असून व्हेस्टिब्यूलमुळे प्रवाशांना एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सहज जाता येणार आहे. दरवाज्यांमध्येही मोठा बदल करत जुन्या उघड्या दरवाज्यांऐवजी स्वयंचलित ‘स्लायडिंग’ दरवाजे बसवण्यात आले आहेत. प्रथम श्रेणीच्या डब्यांची संख्या ३ वरून ४ करण्यात आली असून या बदलांमुळे गाडी अधिक सुरक्षित आणि क्षमतेने सक्षम बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.