चाचणीनंतर स्वयंचलित दरवाजांची लोकल धावणार; आरडीएसओनंतर रेल्वेकडून चाचणी 
मुंबई

Mumbai : चाचणीनंतर स्वयंचलित दरवाजांची लोकल धावणार; आरडीएसओनंतर रेल्वेकडून चाचणी

लोकलची चाचणी यशस्वी झाल्यानंतर मध्य रेल्वेकडून काही चाचण्या करण्यात येतील. यामध्ये यशस्वी झाल्यास ही लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : गर्दीमुळे लोकलमधून पडून प्रवाशांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्वयंचलित दरवाजांची लोकल सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पहिली स्वयंचलित दरवाजांची लोकल मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली आहे. या लोकलची संशोधन, डिझाईन व मानक संस्था (आरडीएसओ) मार्फत लवकरच चाचणीला सुरुवात केली जाणार आहे. या चाचणीनंतर मध्य रेल्वेच्या चाचणीत लोकल यशस्वी झाल्यास ही लोकल प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

दिवा व मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून ४ प्रवाशांना जीव गमवावा लागल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने स्वयंचलित दरवाजे असलेली सामान्य लोकल प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) मध्ये स्वयंचलित दरवाजांची लोकल तयार करण्यात आली. ही लोकल सोमवारी कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. या लोकलच्या चाचणी पूर्ण झाल्यानंतर ती प्रवाशांच्या सेवेत आणायची की नाही, हे ठरवले जाणार आहे. लोकलमध्ये सिमेंटच्या गोण्यामध्ये रेती भरून तिची वहन चाचणी आरडीएसओमार्फत केली जाणार आहे. यासाठी पुरेशी जागा उपलब्ध न झाल्यास या लोकलची चाचणी मुंबईबाहेर होऊ शकते, अशी शक्यताही रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या चाचणीस दोन ते तीन आठवडे लागू शकतात.

लोकलची चाचणी यशस्वी झाल्यानंतर मध्य रेल्वेकडून काही चाचण्या करण्यात येतील. यामध्ये यशस्वी झाल्यास ही लोकल प्रवासी सेवेत दाखल करण्यात येणार आहे. उरण-खारकोपर, नेरूळ-खारकोपर, बेलापूर या मार्गावर लोकल चालवण्याचा विचार रेल्वेकडून सुरू आहे.

तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या दर्शनी भागावर कॅमेरे लावण्यात आले आहेत. लोकल डब्याच्या आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून तसेच लोकल डब्याच्या बाहेरील बाजूस कॅमेरे बसविण्यात आले आहेत. प्रत्येक कॅमेऱ्यात तीन डबे टिपण्याची क्षमता आहे. वातानुकूलित लोकलप्रमाणे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची व्यवस्था या लोकलमध्ये आहे.

ठाण्यात खळबळ! ठाकरेंच्या नेत्याची निर्घृण हत्या; दोन संशयित ताब्यात, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

LPG Cylinder New Rules : १ ऑक्टोबरपासून बदलणार सिलिंडरचे 'हे' ५ नियम; बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

"शिकवायला येतात की Instagram ID मागायला?" वर्गात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थिनीचे गंभीर आरोप, VIDEO

कल्याण : RTO च्या तीन एकर जागेवर अतिक्रमण; रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची वेळ, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आवाहन