मेघा कुचिक/मुंबई
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वेत यंदा आतापर्यंत सात खून झाले, तर खुनाचे तीन प्रयत्न झाले आहेत. लोकलमधील आसनांवरून होणारे वाद, गर्दी आणि किरकोळ भांडणांचे पर्यवसान हिंसक हल्ल्यांत होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सर्व गुन्ह्यांची रेल्वे पोलिसांनी उकल केली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबई उपनगरी रेल्वेत झालेल्या सात खुनांपैकी पाच गुन्हे पश्चिम रेल्वेवर, तर दोन मध्य रेल्वेवर घडले. रेल्वे पोलिसांनी सातही प्रकरणांचा तपास पूर्ण करून आरोपींना अटक केल्यामुळे गुन्हे उकलण्याचे प्रमाण १०० टक्के नोंदवण्यात आले आहे.
२०२५ मधील आकडेवारीशी तुलना केली असता पश्चिम रेल्वेवर गेल्या वर्षी एक खुनाची घटना घडली नव्हती; मात्र खुनाच्या प्रयत्नांचे दोन गुन्हे दाखल झाले होते. मध्य रेल्वेत चार खून
आणि खुनाच्या प्रयत्नांचे चार गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यांची उकल रेल्वे पोलिसांनी केली होती.
१८ डब्यांच्या गाड्यांचे काय झाले...
रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी समीर झवेरी यांनी सांगितले की लोकलच्या इतिहासात प्रथमच प्रवाशांमधील किरकोळ वादांचे रूपांतर खूनात झाले आहे. लोकलमधील प्रचंड गर्दी ही वादांची प्रमुख कारणे आहेत. १८ डब्यांच्या लोकलचा प्रस्ताव २००८-०९ मध्ये मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. दरवर्षी सुमारे अडीच हजार प्रवासी धावत्या लोकलमधून पडतात आणि त्यापैकी सुमारे ५०० जणांचा मृत्यू होतो, असा दावा त्यांनी केला.
अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणेची गरज...
अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ नुकत्याच घडलेल्या घटनेत दोन प्रवाशांमधील वादात एकाने फेकलेला चाकू लक्ष्य चुकून एका ५२ वर्षीय प्रवाशाच्या छातीत घुसला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. अशा घटनांमुळे वादात सामील नसलेल्या प्रवाशांच्याही जिवाला धोका निर्माण होत आहे. गुन्हे घडल्यानंतर तपास करण्यापेक्षा ते रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ, गर्दी नियंत्रण, सीसीटीव्ही आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा वाढवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
२०२६ मधील खुनाच्या घटना (३१ ऑक्टोबरपर्यंत)
एकूण खून : ७
पश्चिम रेल्वे : ५
मध्य रेल्वे : २
सर्व गुन्ह्यांची उकल : १०० टक्के
सर्व सात प्रकरणांचा उलगडा; आरोपी अटकेत
२०२६ मधील हत्येचे प्रयत्न
एकूण घटना : ३
पश्चिम रेल्वे : १
मध्य रेल्वे : २
गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण : १०० टक्के
सर्व प्रकरणांचा उलगडा; आरोपी अटकेत
२०२५ मधील स्थिती
पश्चिम रेल्वे : खुनाची घटना नाही, हत्येच्या प्रयत्नांची दोन प्रकरणे.
मध्य रेल्वे : चार खून, खुनाच्या प्रयत्नांचे चार गुन्हे, सर्व गुन्ह्यांची उकल.