मुंबई : दिवाळीच्या रात्री लागलेल्या आगीचा फटका सोमवारी सकाळी मुंबईच्या लोकल प्रवाशांना बसला. विरार आणि नालासोपारा रेल्वे स्थानकांदरम्यान रविवारी (दि. ८) रात्री रेल्वे रुळांजवळ आग लागली. या आगीत सिग्नल यंत्रणा आणि भूमिगत केबलचं नुकसान झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे आठवड्याच्या सुरूवातीलाच सोमवारी (दि. ९) सकाळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सुमारे १५ ते ३० मिनिटं उशिराने धावत होत्या. ऐन कामावर जाण्याच्या वेळेत लोकलला उशीर झाल्याने हजारो प्रवाशांची गैरसोय झाली. फटाक्यांमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे.
आगीत सिग्नल यंत्रणेचं नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ११.२० वाजता विरार आणि नालासोपारा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांलगत आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री ११.५० वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. मात्र, या आगीत रेल्वेची सिग्नल यंत्रणा आणि जमिनीखालील केबलचं नुकसान झालं. त्यामुळे अनेक ट्रॅक सर्किट बंद पडले. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
लोकल उशिराने; प्रवाशांचे हाल
या बिघाडाचा सर्वाधिक फटका विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांना बसला. सोमवारी सकाळी लोकल सुमारे १५ ते ३० मिनिटं उशिराने धावत होत्या. काही लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही विलंब झाला.
सकाळी कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना लोकलच्या विलंबामुळे मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला. सिग्नल बिघाडामुळे काही स्थानकांवरील लोकलच्या वेळा दाखवणाऱ्या इंडिकेटरवरही योग्य माहिती दिसत नव्हती. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ आणखी वाढला.
फटाक्यांमुळे आग लागल्याचा संशय
दिवाळीनिमित्त फटाके फोडले जात असताना त्यातून ही आग लागली असावी, असा रेल्वे अधिकाऱ्यांचा प्राथमिक संशय आहे. मात्र, आगीचं नेमकं कारण अद्याप निश्चित झालेलं नाही. या आगीमुळे रेल्वेच्या भूमिगत केबलसह सिग्नल यंत्रणेचं नुकसान झाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत रेल्वे वाहतुकीवर परिणाम जाणवला.
रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरू
पश्चिम रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीमुळे अनेक ट्रॅक सर्किट निकामी झाली आहेत. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या नियमानुसार आवश्यक खबरदारी घेत पुढे सोडल्या जात आहेत. यामुळे लोकल आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना विलंब होत आहे.
दरम्यान, खराब झालेल्या केबल आणि सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचं काम रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. लोकल सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.