मुंबई : रेल्वे रूळ, सिंगल यंत्रणा, विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी रात्री सांताक्रुझ ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी या स्थानकांत लोकल थांबणार नाहीत.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या लोकल मुलुंड ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकलला ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
बदलापूर ते कर्जत लोकल सेवा रद्द
मध्य रेल्वेमार्गावरील नेरळ स्थानक येथे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी रविवारी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० पर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकल फेऱ्या अंशत: रद्द केल्या आहेत. या कालावधीत बदलापूर ते कर्जत स्थानकांदरम्यानची लोकल सेवा सकाळी ११.३० ते दुपारी २.३० पर्यंत रद्द असेल.
प.रे.वर या स्थानकात लोकल थांबणार नाहीत
पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील डाऊन धीम्या लोकल मुंबई सेंट्रल ते सांताक्रुझ दरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. लोअर परळ, माहीम, खार रोड स्थानकाच्या फलाटाची लांबी कमी असल्याने, या स्थानकात लोकल दोनदा थांबा घेतील. तर, महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकात जलद मार्गाचे फलाट उपलब्ध नसल्याने या स्थानकात लोकल थांबणार नाहीत. रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल.