मुंबई : लोकलमधील प्रचंड गर्दी कमी करा, महिलांसाठी पुरेसे डबे वाढवा, उपनगरीय सेवा वेळेवर चालवा, एसीचे भाडे कमी करा आदी मागण्यांची यादीच संतप्त प्रवाशांनी गुरुवारी रेल्वे अधिकाऱ्यांना सादर केली.
रेल्वेतर्फे गुरुवारी रेल्वे अधिकारी व प्रवाशांमध्ये ‘जनसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने प्रवासी हजर होते.
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील लोकल प्रवास जीवघेणा बनत आहे. विलंबाने लोकल धावल्याने रोज लेटमार्क लागणे, प्रचंड गर्दी जिवावर बेतणे आदी मुद्यांवर प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांसाठी अधिक 'स्लो' (थांबा घेत जाणाऱ्या) लोकल गाड्या सुरू करणे, एसी लोकलचे भाडे कमी करणे आणि अनधिकृत प्रवाशांवर कडक कारवाई करणे अशा विविध मागण्या प्रवाशांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
प्रवाशांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आणि ज्या क्षेत्रांत सुधारणेची गरज आहे, ती ओळखण्यासाठी या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या.
केंद्र सरकारच्या ‘प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागा’च्या सचिव निवेदिता शुक्ला वर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवाशांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव आणि मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक हिरेष मीना उपस्थित होते.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांनी मुंबई सेंट्रल येथे अशाच प्रकारचा संवाद साधला.
डोंबिवली आणि बदलापूरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रचंड गर्दीमुळे गाड्यांमध्ये चढताना आणि उतरताना होणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधले. प्रवाशांनी दिवा स्थानकावरून जलद लोकल सेवा सुरू करण्याचीही मागणी केली. याशिवाय, सकाळी ९:२५ वाजता ठाण्यावरून सुटणाऱ्या लोकल नंतर कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांसाठी पुरेशा 'स्लो' लोकल उपलब्ध नसल्याची तक्रारही समोर आली, ज्यामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळी प्रवाशांसमोर पर्यायांची कमतरता निर्माण होते, असे प्रवाशांनी सांगितले.