Mumbai : एसी, प्रथम श्रेणी पास महागणार! दोन हजारांवरील UPI व्यवहारांवर ५.९० रुपये अतिरिक्त शुल्क लागू होणार 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : एसी, प्रथम श्रेणी पास महागणार! दोन हजारांवरील UPI व्यवहारांवर ५.९० रुपये अतिरिक्त शुल्क लागू होणार

दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची रेल्वे तिकिटे किंवा उपनगरीय सीझन पास यूपीआयद्वारे खरेदी करणाऱ्या प्रवाशांना १५ ऑक्टोबरपासून अतिरिक्त ५.९० रुपये मोजावे लागणार आहेत. हा नवा नियम १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून अंमलात येणार असून उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटांसाठी तो लागू राहील.

Swapnil S

मुंबई : दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक किमतीची रेल्वे तिकिटे किंवा उपनगरीय सीझन पास यूपीआयद्वारे खरेदी करणाऱ्या प्रवाशांना १५ ऑक्टोबरपासून अतिरिक्त ५.९० रुपये मोजावे लागणार आहेत. हा नवा नियम १४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून अंमलात येणार असून उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकिटांसाठी तो लागू राहील. त्यामुळे एसी आणि प्रथम श्रेणीचे पास सहा रुपयांनी महागणार आहेत.

साप्ताहिक, पंधरवड्याचे, मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक सीझन पासची किंमत २ हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यांनाही हा नियम लागू होणार आहे. प्रवाशांना रेल्वे खिडकीवर नेहमीप्रमाणे तिकीट खरेदी करता येईल, मात्र ऑनलाइन यूपीआय व्यवहारांवर हे अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

तर प्रथम श्रेणी, एसी पासधारकांना फटका

विशेषतः प्रथम श्रेणी आणि एसी पासधारकांना या शुल्काचा फटका बसणार आहे. सीएसएमटी-कर्जत/कल्याण मार्गावरील एसी मासिक पासची किंमत २,३४० रुपये असल्यास यूपीआयद्वारे तो खरेदी करताना प्रवाशाला आता २,३४५.९० मोजावे लागतील. त्याचप्रमाणे सीएसएमटी-कल्याण प्रथम श्रेणीचा त्रैमासिक पास ३,२९५ रुपये असून यूपीआयद्वारे व्यवहार केल्यास तो आता ३,३००.९० रुपयांना पडेल. सीएसएमटी-पनवेल एसी मासिक पासाची सध्याची किंमत २,७५० रुपये असून, पात्र यूपीआय व्यवहारात त्यासाठी २,७५५.९० रुपये मोजावे लागतील. मुंबईच्या उपनगरीय रेल्वेत मोठ्या संख्येने मासिक आणि त्रैमासिक पासधारक आहेत. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या आणि २ हजारांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार करणाऱ्या प्रवाशांवर या शुल्काचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

रेल्वेनेच शुल्कभार उचलण्याची मागणी

पश्चिम रेल्वे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य कैलास वर्मा यांनी हे शुल्क प्रवाशांवर न टाकता रेल्वेनेच सहन करावे, अशी मागणी केली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेत दररोज सुमारे ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे उपनगरीय रेल्वे व्यवहारांसाठी विशेष बाब म्हणून एमडीआर माफ करण्याचा प्रस्ताव रेल्वेने अर्थ मंत्रालयाकडे पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

पिकांच्या नुकसानीपोटी सरसकट मदत; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही, संकटकाळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

ज्ञानेशकुमारांवर विरोधकांचा हल्लाबोल; अटक करून महाभियोग चालविण्याची आक्रमक मागणी; निवडणूक आयोग बचावात्मक पवित्र्यात

IIT बॉम्बेतील साहिल वाखोडे आत्महत्या प्रकरण: गुन्हे शाखेसमोर 'फोन अनलॉक'चे आव्हान

डीजे, लेझरवर बंदी; 'सारे काही आलबेल', हे चालणार नाही - उच्च न्यायालय

भाजपने भाकरी फिरवली, संघटनेत खांदेपालट