अभिषेक पाठक / मुंबई :
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि गाड्यांची वारंवारता वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून ‘कवच ५.०’ ही अत्याधुनिक स्वदेशी ‘ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन’ (एटीपी) प्रणाली विकसित केली जात आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे सध्या तीन मिनिटांवर चालणाऱ्या लोकल गाड्यांमधील अंतर कमी होऊन त्या दर दोन मिनिटांनी चालवणे शक्य होणार आहे.
सिग्नल यंत्रणेचे उल्लंघन, ओव्हरस्पीडिंग आणि दोन गाड्यांची धडक रोखून सुरक्षेत मोठी सुधारणा होणार आहे. मुंबईची उपनगरीय रेल्वे ही जगातील सर्वात व्यस्त नेटवर्कपैकी एक असून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे ६५ ते ६८ लाख प्रवासी प्रवास करतात. सध्या दोन्ही रेल्वे मार्ग मिळून दररोज ३,२५४ वातानुकूलित (एसी) आणि बिगर-एसी लोकल फेऱ्या चालवल्या जातात.
सध्याची सिग्नल यंत्रणा तिच्या कमाल क्षमतेने कार्यरत असल्याने, प्रगत तंत्रज्ञानाशिवाय लोकल फेऱ्यांची संख्या वाढवणे कठीण असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर तोडगा म्हणून भारतीय रेल्वेने उपनगरीय नेटवर्कसाठी विशेषत: ‘कवच ५.०’ विकसित करण्यास सुरुवात केली आहे. ही यंत्रणा दोन गाड्यांमधील सुरक्षित अंतर कमी करेल, ज्यामुळे त्याच रुळांवर सुरक्षेशी तडजोड न करता अधिक गाड्या चालवता येतील.
या प्रणालीची पूर्ण अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईच्या नेटवर्कवर दररोज सुमारे ४,००० लोकल फेऱ्या चालवणे शक्य होईल, ज्यामुळे ‘पीक अवर्स’मध्ये होणाऱ्या गर्दीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ११ एप्रिल २०२५ रोजी ‘कवच ५.०’ च्या विकासाची घोषणा केली होती. ‘रिसर्च डिझाईन्स अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन’ (आरडीएसओ) सध्या या तंत्रज्ञानाच्या तांत्रिक तपशील अंतिम टप्प्यात काम करत आहे. याच वेळी भारतीय रेल्वे पश्चिम रेल्वेच्या ६९३ किलोमीटरच्या मुंबई-दिल्ली हाय-डेंसिटी मार्गासह प्रमुख मार्गांवर ‘कवच ४.०’ लागू करत आहे.
सध्याच्या सिग्नल व्यवस्थेच्या तुलनेत ‘कवच ५.०’ ही ‘कॅब-बेस्ड’ सिग्नल सिस्टिम म्हणून काम करेल, जिथे सिग्नलची माहिती थेट चालकाच्या केबिनमध्ये दिसेल. यामुळे रूळांच्या कडेला असलेल्या पारंपारिक सिग्नल खांबांवरील अवलंबित्व कमी होईल आणि मुसळधार पाऊस, धुके किंवा खराब दृश्यमानतेदरम्यानही ट्रेन चालकांना अचूक माहिती मिळेल. मध्यंतरीच्या काळात पारंपारिक सिग्नलचा बॅकअप म्हणून वापर सुरू राहील.
ही प्रणाली धोक्याचा सिग्नल ओलांडण्याच्या (एसपीएडी) घटना आपोआप रोखण्यासाठी, वेग नियंत्रित करण्यासाठी आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार इमर्जन्सी ब्रेक लावण्यासाठी डिझाइन केली आहे. सध्या मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कवर मध्य रेल्वे १२० एसी लोकलसह १,८४० फेऱ्या आणि पश्चिम रेल्वे १४५ एसी लोकलसह १,४१४ फेऱ्या चालवते. ‘कवच ५.०’ च्या आगमनाने पायाभूत सुविधांचा मोठा विस्तार न करता क्षमता वाढेल.
आपत्कालीन ब्रेक आपोआप लागतील
ही प्रणाली ‘सिग्नल पास्ड ॲॅट डेंजर’ म्हणजे लाल सिग्नल ओलांडण्याच्या घटना आपोआप रोखेल. तसेच, गाडीचा वेग नियंत्रित करेल आणि अपघाताचा धोका निर्माण झाल्यास आपत्कालीन ब्रेक आपोआप लागू करेल. रेल्वेगाड्यांचा वेग आणि हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून ‘कवच ५.०’ अतिरिक्त सुरक्षा कवच प्रदान करेल, तसेच दोन गाड्यांमधील अंतर सुरक्षितपणे कमी करण्यास मदत करेल.