मुंबई : महालक्ष्मी येथील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या अडचणी वाढल्या आहेत. रेसकोर्स परिसरातील वृक्षतोड, पुनर्रोपण आणि नवीन वृक्षलागवडीमध्ये कथित अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर मुंबई महापालिकेने क्लबविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. एकीकडे महापालिकेच्या उद्यान विभागाने वृक्ष संरक्षण कायद्याच्या उल्लंघनाप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे, तर दुसरीकडे जी-दक्षिण विभागाने बांधकाम तातडीने थांबविण्याची ‘स्टॉप वर्क’ नोटीस बजावली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौडकर यांनी माहिती अधिकारातून मिळविलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
रेसकोर्स परिसरात प्रस्तावित असलेल्या ‘रेसकोर्स मिनी क्लब हाऊस’च्या बांधकामासाठी एकूण २५ झाडे हटविण्याची परवानगी मागण्यात आली होती. यासाठी मे. आकार आर्किटेक्ट्स यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पालिकेकडे प्रस्ताव सादर केला होता. वृक्ष प्राधिकरणाने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला १३ झाडे तोडण्यास, १२ झाडांचे पुनर्रोपण करण्यास आणि ४३ झाडे आहे त्याच जागी कायम ठेवण्यास परवानगी दिली होती.
वृक्षतोडीच्या बदल्यात १,२३२ नवीन झाडे लावण्याची अट घालण्यात आली होती. मात्र, महापालिकेच्या कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या पाहणीत परवानगीतील अटींच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. तोडण्यास मंजुरी दिलेल्या १३ झाडांपैकी सात झाडे तोडण्यात आली होती, तर सहा झाडे जागेवरच होती. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
अर्ध्याहून कमी झाडे लावली
वृक्षतोडीच्या बदल्यात १,२३२ नवीन झाडे लावण्याची अट असताना आतापर्यंत केवळ ५५० झाडे लावण्यात आली आहेत. म्हणजेच आणखी ६८२ झाडांची लागवड होणे बाकी आहे. या अनियमिततेबाबत महापालिकेने १४ ऑगस्ट २०२६ रोजी क्लबला पत्र पाठवून खुलासा मागविला होता. मात्र, उद्यान विभागाच्या माहितीनुसार अद्याप क्लबकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही.
पुनर्रोपण आणि वृक्षसंवर्धनातही त्रुटी
१२ झाडांच्या पुनर्रोपणाबाबतही विसंगती आढळली. महापालिकेच्या मूळ पाहणी अहवालानुसार सात झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले होते. तीन झाडे मूळ जागीच होती, तर दोन झाडे आढळून आली नव्हती. याशिवाय जागेवर कायम ठेवण्याची अट असलेल्या ४३ झाडांपैकी आठ झाडे पाहणीदरम्यान गायब असल्याचे निदर्शनास आले.
गुन्हा दाखल
महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने ताडदेव पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला.