मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हयातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना शनिवारी, ६ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून त्या विभागातील कामगार व कर्मचाऱ्यांना सुट्टी लागू होणार नाही, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
ज्या कार्यालयांमध्ये सुट्टी लागू होणार नाही, त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाची अर्जित रजा (Earned Leave) दिली जाईल. शासकीय परिपत्रकानुसार मुंबई महानगरपालिकेच्या ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका कार्यालयांतही हीच अंमलबजावणी होणार आहे.
मध्य रेल्वेकडून १२ अतिरिक्त लोकल सेवा, BEST कडूनही विशेष बस सेवा
मध्य रेल्वेने जाहीर केले आहे की ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीकडे मोठ्या प्रमाणावर लोक प्रवास करणार असल्याने १२ विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. या अतिरिक्त लोकल सेवा परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल दरम्यान शुक्रवार-शनिवारच्या मध्यरात्री (००.४५ ते ४.००) चालतील. या गाड्या कुर्ला, कल्याण, ठाणे, परळ, वाशी आणि पनवेल येथून सुटतील. भक्तांच्या सोयीसाठी BEST ला अतिरिक्त बस सेवा तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
चोख सुरक्षा, सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा - मुख्यमंत्री
देशभरातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी परिसर तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून पिण्याचे पाणी, सूचना फलक, बेस्ट उपक्रमाच्या वतीने अतिरिक्त बसेस चालवण्यात येणार आहेत. महापरिनिर्वाण दिनासाठी चोख सुरक्षा सेवासुविधांची काटेकोर अंमलबजावणी करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणेला दिले. इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्यासंदर्भात विविध सूचना प्राप्त झाल्या असून याबाबत समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला ज्ञान दिले आणि जागरूक केले. या जागरूकतेला अधिक बळकटी देण्याचा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण करूया, असेही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. चैत्यभूमी परिसरात योग्य मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दादर व आसपासच्या परिसरात वाहतूक पोलीस यंत्रणांनी रहदारीचे योग्य नियोजन आणि नियंत्रण करावे. अनुयायांना मार्गदर्शन मिळावे यासाठी जागोजागी सूचनाफलक लावावेत. तसेच, नागरिकांना सुलभ प्रवासासाठी बेस्टतर्फे अतिरिक्त बससेवा उपलब्ध ठेवावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. महापरिनिवार्ण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था, सुरक्षेची व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बस सेवा, भोजन व्यवस्था, चैत्यभूमी परिसरात वॉटरप्रूफ मंडप, स्वच्छतागृहे, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, पुष्पवृष्टी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर सर्व सोयीसुविधा यांचा सविस्तर आढावाही घेण्यात आला.