मुंबई : राज्याच्या राजकारणात परस्परविरोधी भूमिका मांडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गुरुवारी (२९ ऑक्टोबर) एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. यावेळी निमित्त राजकीय सभेचे नसून मराठी व्यंगचित्रकलेचे आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या 'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी हे तिन्ही नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात गुरुवारी सायंकाळी ७ वाजता हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे पुस्तक प्रकाशनाच्या या कार्यक्रमाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
मराठी व्यंगचित्रकलेचा शंभर वर्षांचा मागोवा
'महाराष्ट्राच्या हास्यरेषा' या ग्रंथातून मराठी व्यंगचित्रकलेचा शंभर वर्षांचा प्रवास उलगडण्यात आला आहे. गेल्या शतकात या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यंगचित्रकारांचा परिचय आणि त्यांच्या निवडक कलाकृती पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
सामाजिक हास्यचित्रे, पॉकेट कार्टून, कॉमिक स्ट्रिप, अर्कचित्रे, इलस्ट्रेशन आणि राजकीय व्यंगचित्रे अशा विविध प्रकारांचा या ग्रंथात समावेश आहे. त्यामुळे मराठी व्यंगचित्रकलेतील विविध प्रवाह आणि काळानुसार बदलत गेलेली तिची शैली वाचकांना जाणून घेता येणार आहे. 'ग्रंथाली'ने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.
नामवंत व्यंगचित्रकारांची उपस्थिती
या प्रकाशन सोहळ्याला अनेक नामवंत व्यंगचित्रकार उपस्थित राहणार आहेत. डॉ. मृण्मयी भजक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. 'ग्रंथाली'चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर आणि संपादक अरुण जोशी यांचीही उपस्थिती असेल. धनश्री धारप या कार्यक्रमाच्या संयोजक असून, हा सोहळा सर्वांसाठी खुला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा मुद्दा, कर्जत येथील वृक्षतोड आणि अन्य प्रश्नांवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले तर त्यांच्या भाषणांमध्ये कोणते मुद्दे मांडले जातात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. तसेच, या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी रंगणार, की तिन्ही नेते पुस्तक आणि मराठी व्यंगचित्रकलेवरच भर देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.