मुंबईच्या मालाड परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेडछाड करून तिला धावत्या रिक्षेतून खाली ढकलल्याप्रकरणी ५४ वर्षीय रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. POCSO कायदा आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपीचे नाव केशव यादव असून तो कांदिवली पश्चिम येथे वास्तव्यास आहे.
नेमकं काय घडलं?
माहितीनुसार, ही घटना ८ डिसेंबर रोजी घडली. पीडित मुलगी मालाड पश्चिम येथील एका नामांकित महाविद्यालयात शिकत आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास ती एस. व्ही. रोडवरून सुराणा हॉस्पिटलकडे जाण्यासाठी रिक्षा शोधत होती. तेव्हे तेथे एक रिक्षा आली. “रस्त्याचं काम सुरू आहे” असा बहाणा करत रिक्षाचालकाने तिला सीटच्या मधोमध बसायला सांगितलं.
आरशातून बघत अश्लील हावभाव
रिक्षा सुरू झाल्यावर त्याने मुलीने सांगितलेला मार्ग न घेता दुसऱ्या दिशेने रिक्षा वळवली. मागील आरशातून तिच्याकडे पाहत तो अश्लील हावभाव करू लागला. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनीने रिक्षा थांबवण्यास सांगितली, पण त्याने रिक्षाचा वेग अजूनच वाढवला. मुलगी मदतीसाठी ओरडू लागल्यावर आरोपीने तिला धमकावले. काहीच क्षणांत मुलगी अधिक जोरात किंचाळताच त्याने तिला धावत्या रिक्षेतून जोरात बाहेर ढकलले. त्यावेळी रस्त्यावर गाड्यांची वर्दळ असल्याने तिच्या जीवालाही धोका होता. घरी पोहोचताच मुलीने संपूर्ण प्रकार आई आणि बहिणीला सांगितला आणि त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत भारतीय न्याय संहिता कलम ७९ (महिलेशी लज्जास्पद वर्तन), १०९ (खुनाचा प्रयत्न) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम १२ (अल्पवयीनांवरील लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा नोंदवला.
रिक्षातच झोपलेल्या आरोपीला अटक
लगेचच पोलिसांनी तपास सुरू केला आणि सुमारे ३० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर रिक्षाचा क्रमांक मिळाला. पुढील लोकेशन ट्रेस करून पोलिसांनी काही तासांतच रिक्षा कांदिवली पश्चिम, मथुरादास रोड परिसरात शोधली. अटक करताना आरोपी रिक्षातच झोपलेला आढळला. त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
आरोपीविषयी काय समोर आले?
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी स्वतः रिक्षातच राहायचा. रिक्षा इतर व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असली तरी आरोपीच खरा मालक असून त्याच्या विरोधात यापूर्वी कोणतीही गुन्हेगारी नोंद नव्हती. ही कारवाई डीसीपी संदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मालाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दुश्यंत चव्हाण यांच्या देखरेखीत करण्यात आली.