Mumbai : साथीच्या आजारांचा विळखा! चार महिन्यांत मलेरिया, डेंग्यूचा उद्रेक; डासांच्या ३० हजारांहून अधिक अळ्या सापडल्या प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai : साथीच्या आजारांचा विळखा! चार महिन्यांत मलेरिया, डेंग्यूचा उद्रेक; डासांच्या ३० हजारांहून अधिक अळ्या सापडल्या

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा मुंबईला घट्ट विळखा पडला आहे. गेल्या चार महिन्यांत मलेरियाच्या ७४२२, डेंग्यूचे २९४१ तर लेप्टोच्या २८६ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, मलेरिया डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस व अनोफिलीस डासांच्या २९ हजार ७१५ उत्पत्ती स्थाने आढळली आहेत.

Swapnil S

मुंबई : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा मुंबईला घट्ट विळखा पडला आहे. गेल्या चार महिन्यांत मलेरियाच्या ७४२२, डेंग्यूचे २९४१ तर लेप्टोच्या २८६ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, मलेरिया डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस व अनोफिलीस डासांच्या २९ हजार ७१५ उत्पत्ती स्थाने आढळली आहेत. मुंबईत ५२ लाख ५१ हजार ५९८ लोकांचा सर्व्हे केला असून ६३ हजार ८३७ लोकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत हवा तसा पाऊस बरसला नसला तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी मुंबईत घट्ट पाय रोवले आहेत. साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. मात्र जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो चिकनगुनिया, स्वाईन फ्लू या आजारांनी मुंबईकर त्रस्त आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व पालिका रुग्णालये आणि आरोग्य केंद्रांच्या परिसरात मलेरिया व डेंग्यूच्या प्रतिबंधासाठी नियमित सर्वेक्षण, अळीनाशक फवारणी आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा नायनाट करण्यासाठी विशेष मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. रुग्णालयाच्या परिसरात डासांची उत्पत्ती रोखून तिथे येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टरांना मलेरिया व डेंग्यूसारख्या आजारांपासून वाचवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिकेकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

२३,४०५ एडिस डासांची उत्पत्ती स्थाने

यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गतवर्षाच्या तुलनेत काहीशी घट झाली आहे. डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखण्याचे मोठे आव्हान कायम आहे. पालिकेने तब्बल १० लाख ४४ हजार ०५५ उत्पत्ती स्थाने तपासली, त्यापैकी २३ हजार ४०५ एडिस डासांची उत्पत्ती आढळली.

अंधेरी, दहिसरमध्ये लेप्टोचे अधिक रुग्ण !

लेप्टोस्पायरोसिसच्या बाबतीतही महापालिकेने काही भाग धोक्याचे असल्याचे नमूद केले आहे. सांताक्रूझ-वाकोला, दहिसर, मरोळ, माटुंगा, वडाळा, सायन विभागातील विविध परिसरांत लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्यातून विना चप्पल चालणे टाळावे आणि शक्य असल्यास गमबूट वापरावेत, असा सल्ला मुंबई महानगरपालिकेने मुंबईकरांना दिला आहे. त्यानुसार खबरदारी घ्यावी.

६,३१० अनोफिलीस डासांची उत्पत्ती स्थाने

मलेरियाच्या फैलावास कारणीभूत अनोफिलीस डासांची ३८ हजार ०२८ उत्पत्ती स्थानांची तपासणी करण्यात आली. यात ६,३१० अनोफिलीस डासांची उत्पत्ती स्थाने आढळली.

चार महिन्यांत रुग्णांची नोंद

  • मलेरिया - ७,४२२

  • डेंग्यू - २,९४१

  • लेप्टो - २८६

  • चिकनगुनिया - ६६

  • एच वन एन वन - ५०४

  • गॅस्ट्रो - २१९४

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : आंदोलकांवर कारवाईचा बडगा! MPSC विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात

बदलापूरच्या रस्त्यावर थुंकल्यास ५०० रुपये दंड; नियमांचे पालन करा, नगर परिषदेचे आवाहन

Mumbai : सत्कार केटरर्ससह ८ उपाहारगृहांचे परवाने निलंबित; अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या उल्लंघनेनंतर FDA ची कारवाई

Mumbai : न्यायालयाच्या कामकाजाचे गुपचूप रेकॉर्डिंग करणे पडले महागात

Ulhasnagar : महापालिकेतील सत्तासंघर्ष थेट पोलिसांच्या दारात; शिवसेना-भाजपच्या दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल