मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारच्यावतीने मराठी चित्रपट निर्मितीला अर्थसहाय्य या योजनेंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण केलेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील ६५ चित्रपट आणि कोविड काळातील ९८ चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी चित्रपटगृहांचे जतन आणि विकास करण्यात येणार आहे तसेच मुंबईत एकत्रित सुविधांसह स्वतंत्र नाट्यगृह व चित्रपटगृह उभारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, विविध चित्रपटाचे निर्माते यावेळी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘श्यामची आई’ या चित्रपटास ७९ लाखांचा निधी वितरित करण्यात आला तसेच अपर्णा होशींग, शेट्टी, स्नेहल तरडे या दिग्दर्शक महिलांना प्रत्येकी ५ लाख प्रोत्साहन निधी देऊन गौरवण्यात आले.
गुणवत्तापूर्ण चित्रपटांना चालना
२०१८ ते २०२२ या कोविड काळात सर्व व्यवस्था ठप्प झाली होती. या कालावधीत निर्मात्यांची अवस्था गंभीर झाली होती. या कालावधीतील सेन्सॉर प्राप्त चित्रपटांना ४ कोटी ९० लाख रुपयांचे वितरण करण्यात येत आहे. चित्रपटाचे परीक्षण करण्यासाठी २८ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. हे सदस्य चांगल्या प्रकारे काम करत आहेत. चित्रपटांचे परीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने २०२३ ते २०२६ या कालावधीमध्ये ४९६ चित्रपटांचे परीक्षण केले आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटांचा सार आपल्या समोर आणलेला आहे. त्यातून गुणवत्तापूर्ण चित्रपटांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
महाराष्ट्र हा वैभव संपन्न व प्रतिभा संपन्न आहे. महाराष्ट्रात कला, साहित्य, जागरूक नागरिक, उत्कृष्ट कलावंत या सगळ्याची पेरणी आहे. दर्जेदार मराठी चित्रपट निर्माण व्हावे यासाठी प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन काम करत आहे. मराठी क्षेत्रातील निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना कार्यान्वित आहेत. त्या माध्यमातून चित्रपटांच्या ‘अ’ दर्जासाठी ४० लाख, ‘ब’ दर्जासाठी ३० लाख आणि क दर्जासाठी दहा लाख रुपये अनुदान वाटप करण्यात येत आहे.आशीष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री