येत्या रविवारी, (दि.१८) देश-विदेशातील हजारो धावपटू टाटा मुंबई मॅरेथॉनसाठी मुंबईच्या रस्त्यांवर उतरणार आहेत. आशियातील सर्वात मोठ्या मॅरेथॉन स्पर्धांपैकी एक असलेल्या या इव्हेंटमुळे उत्साह, तयारी आणि अपेक्षा शिखरावर पोहोचल्या आहेत.
मुंबईची आर्द्रता, पहाटेचा उकाडा, वाऱ्याची अनिश्चितता आणि मॅरेथॉनचे लांबचे अंतर लक्षात घेता, मॅरेथॉनच्या दिवशी काय परिधान करावे याचा योग्य विचार करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. चुकीचे कपडे, नवीन बूट किंवा अस्वस्थ करणाऱ्या ऍक्सेसरीज यांचा धावण्यावर थेट परिणाम होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर, धावपटूंनी मॅरेथॉनच्या दिवशी काय घालावे आणि काय टाळावे, ते जाणून घेऊया.
मॅरेथॉनमध्ये धावताना कोणते कपडे घालायचे?
हलके, घाम शोषणारे टी-शर्ट मॅरेथॉनसाठी बेस्ट ऑप्शन ठरतील. हलके आणि घाम शोषून घेणारे टी-शर्ट किंवा बनियान (Vest) परिधान करा. पॉलिस्टर कापडाचे कपडे घाम त्वचेपासून दूर ठेवण्यास मदत करतात आणि घर्षणामुळे होणारी चिडचिड कमी करतात. तुम्ही सरावादरम्यान वापरलेले, आधीच तपासून पाहिलेले रेस टी-शर्ट वापरणे अधिक योग्य ठरेल.
धावताना वर सरकणार नाहीत किंवा घर्षण होणार नाहीत असे शॉर्ट्स, कॅप्रिस किंवा टाइट्स निवडा. शरीराला नीट बसणारे, पण घट्ट नसणारे कपडे मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी उत्तम ठरतात.
न रगडणारे आणि न चढणारे कपडे
बुटांबाबत कोणतीही तडजोड करू नका. अनेक आठवडे सरावात वापरलेलेच बूट मॅरेथॉनच्या दिवशी परिधान करा. तुम्हाला धावताना त्रास होणार नाही असेच बूट मॅरेथॉनच्या दिवशी वापरा.
उत्तम दर्जाचे सॉक्स वापरणे महत्त्वाचे आहे. धावताना पायाला फोड येऊ नये तसेच पाय कोरडे राहावेत, यासाठी मऊ कापडाचे सॉक्स वापरा.
पहाटेच्या सूर्यप्रकाशापासून बचावासाठी कॅप उपयुक्त ठरेल. तर सनग्लासेस डोळ्यांचे संरक्षण करतील. यासोबतच, घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरू नका.
तसेच, ज्या ठिकाणी घर्षण होण्याची शक्यता असते, जसे की मांड्या, काख आणि पाय, याठिकाणी पेट्रोलियम जेली लावल्यास त्वचेची जळजळ टाळता येते.
मॅरेथॉनमध्ये धावताना कोणत्या गोष्टी टाळायच्या?
मॅरेथॉनला धावताना नवीन कपडे किंवा बूट वापरल्यास फोड, पुरळ किंवा अस्वस्थता वाटू शकते. त्यामुळे आधी सरावात वापरलेले आणि तपासून पाहिलेलेच साहित्य वापरा.
कापूस घाम शोषून धरतो, त्यामुळे कपडे जड होतात आणि त्वचेवर घर्षण होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे मॅरेथॉनसाठी कॉटनचे कपडे पूर्णपणे टाळावेत.
घड्याळ, दागिने, पट्टे किंवा बॅग्स धावताना अडथळा ठरू शकतात आणि लक्ष विचलित करू शकतात. त्यामुळे, फक्त धावण्यासाठी आवश्यक असलेली स्मार्ट गॅझेट्स किंवा वस्तू सोबत ठेवा.
अतिघट्ट कपडे हालचालींवर मर्यादा आणतात, तर अतिसैल कपड्यांमुळे घर्षण होऊ शकते. त्यामुळे दोन्हींचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे.
नवीन इअरफोन, आर्मबँड किंवा हायड्रेशन पॅक मॅरेथॉनला वापरण्याचे टाळा. यामुळे धावण्यात व्यत्यय येऊ शकतो आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते.