मुंबई

चैन पडेना आम्हाला! गणरायाला भावपूर्ण निरोप; पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषात विसर्जन सोहळा 

Swapnil S

मुंबई : यंदा सात सप्टेंबरला घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांच्या मंडपामध्ये प्रतिष्ठापना झालेल्या श्री गणरायांच्या मूर्तींना मंगळवारी अनंत चतुर्दशीला अत्यंत भक्तिमय वातावरणात निघालेल्या भव्य विसर्जन मिरवणूकांद्वारे निरोप देण्यात आला.

लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा राजा यांसारख्या अनेक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. विसर्जन मिरवणुकांमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले होते. बेस्ट बसच्या अनेक मार्गांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले.

ढोल ताशा पथकांचा गजर, त्यावर ताल धरलेले अबालवृद्ध भक्त, बाप्पाच्या दिमाखदार, आकर्षक मूर्तीचे रूप डोळ्यात साठवत हात जोडणारे  भाविक, त्यातच गुलाल आणि फुलांची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे भक्तीपूर्ण साकडे घालणाऱ्या घोषणा, यामुळे अवघ्या मुंबईचे वातावरण गणेशमय झाले होते.

महापालिकेकडून २०४ कृत्रिम तलाव

मुंबई महापालिकेने यंदा ६९ नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या व्यतिरिक्त २०४ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. यांना प्रथमच कृत्रिम तलावांची माहिती गुगल मॅप वर उपलब्ध करण्यात आली होती. कृत्रिम तलाव शोधण्यासाठी क्यू आर कोडचा पर्याय देण्यात आला होता. श्री गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षणही दिले होते. मंगळवारी विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेचे १५ हजार अधिकारी कर्मचारी ७१ नियंत्रण कक्षांतून कार्यरत होते. प्रमुख चौपाट्यांच्या किनाऱ्यावर विसर्जनाची वाहने वाळूत रुतू नयेत यासाठी ४७८ स्टील प्लेट टाकण्यात आल्या होत्या. छोट्या मूर्तींच्या विसर्जनासाठी ४३ जर्मन तराफे उपलब्ध केले होते. चौपाट्यांवर सुरक्षेसाठी ७६१ जीवरक्षक, ७८ मोटार बोटी तैनात होत्या. निर्माल्य संकलनासाठी १६३ कलश आणि २७४ वाहने ठेवली होती. पालिकेच्या विविध खात्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या समन्वयासाठी १९२ नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले होते. सुरक्षेच्या दृष्टीने ६६ निरीक्षण मनोरे तसेच ७२ स्वागत कक्ष होते. ७५ प्रथमोपचार केंद्रांसह ६७ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. नागरिकांच्या सोयीसाठी १२७ फिरती प्रसाधन गृहे उपलब्ध केली होती.

बेस्टच्या बसचे मार्ग बदलले

दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी लालबागच्या राजाची मिरवणूक भारत माता जंक्शन येथे आल्याने मार्ग क्रमांक ६६ च्या बस लालबाग पुलावरून एस ब्रिज मार्गे सात रस्ता  निम्न दिशेने चालविण्यात आल्या. दुपारी बारा वाजता चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्गावर गणपती विसर्जन मिरवणुका आल्याने बस मार्ग क्रमांक ३७९, ३८० व ३७७ जिजाबाई भोसले मार्गाने छेडानगर अमर महाल असे परावर्तित करण्यात आले. मिरवणुकांच्या गर्दीमुळे बस क्रमांक ६०८ व ६१२ दुपारी एक वाजल्यापासून सह्याद्रीनगर येथे खंडित करण्यात आले. बस मार्ग क्रमांक ६०१ आणि ६२४ चा रस्ता बंद केल्यामुळे या मार्गावरील बस दुपारी एक वाजून वीस मिनिटांपासून स्थगित करण्यात आल्या. सेल कॉलनी येथून गणपती विसर्जन मिरवणूक निघाल्यामुळे बस मार्ग क्रमांक हे ३५७ हे ३६० व ३५५ मर्यादितच्या गाड्या चेंबूर स्थानक येथून हे ३७५ मार्गे चेंबूर नाक्यापर्यंत चालविण्यात आल्या. लालबाग येथे सकाळी साडेनऊ वाजता गणपती विसर्जन मिरवणुकांमुळे बी. ए. रोडवरील वाहतूक पोलिसांनी थांबविली. त्यामुळे मार्ग क्रमांक चार, पाच, सहा मर्यादित,आठ, ११, १९, ५१ आदी बस लालबाग पुलावरून वळविण्यात आल्या. गणपती विसर्जनामुळे लालबाग येथे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी बस मार्ग क्रमांक एक, चार, पाच, सहा, सात, आठ, ११, १४, १९, २१, २२, २५, ५१ आदींचा मार्ग लालबाग पुलावरून वळविला होता. त्याचप्रमाणे प्रभादेवी खेतवाला मार्ग पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे बस मार्ग क्रमांक १६७ हा संत रोहिदास चौक येथे सकाळी दहा वाजल्यापासूनच खंडीत करण्यात आला होता. गणपती विसर्जनामुळे भाविकांची गर्दी जमल्यामुळे बस मार्ग क्रमांक ५७, १४ खानविलकर चौकातून पुढे आचार्य दोन्दे मार्गाने एलफिस्टन ब्रिजवरून डावे वळण घेऊन पुढे नेण्यात आला. विसर्जन मिरवणुकीच्या गर्दीमुळे चेंबूर वसाहत ते देवनार आगारापर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे बस मार्ग क्रमांक २१, ३६२, ३६४, ३९९, ६६३ आधी चेंबूर नाका -  आर. के. स्टुडिओ मार्गाने वळविण्यात आले होते. 

चौपाटीवर विसर्जनासाठी गर्दी

मुंबई शहरात स्वराज्य भूमी -गिरगाव चौपाटी, दर्या नगर, कुलाबा, गेटवे ऑफ इंडिया, भाऊचा धक्का, हाजी बंदर, शिवडी बंदर, बाणगंगा तलाव, बॅरिस्टर रजनी पटेल चौक, वरळी चौपाटी, वरळी कोळीवाडा, प्रभादेवी, दादर चौपाटी, नॅशनल रुग्णालय, माहीम रेतीबंदर आदी ठिकाणी मूर्तींचे विसर्जन झाले. त्याचप्रमाणे खार दांडा कोळीवाडा, वांद्रे बँड स्टँड, जुहू चौपाटी, वेसावे किनारा, श्याम नगर तलाव, बांगुर नगर, गोरेगाव, भोजले तलाव, मार्वे खाडी, मालाड, अक्सा किनारा, गोराई, एक्सरगाव, कांदरपाडा, दहिसर, शिंपोली, बोरीवली या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर मूर्तींचे विसर्जन झाले. सायन तलाव, माहुल जेट्टी, तुर्भे खाडी, चरई तलाव, चेंबूर, शिवाजीनगर, शितल तलाव, कांजूर, पवई तलाव, शिवाजी तलाव, भांडुप, ठाणे खाडी पूल या ठिकाणीही गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन झाले.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला