मुंबई : चर्चगेट येथील महर्षी कर्वे रोडवरील आयकर भवनाच्या तळघरात सोमवारी दुपारी २.०१ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. तळघरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने इमारतीतील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल २८ जणांची सुखरूप सुटका केली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही जखमी झाले नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
चर्चगेट महर्षी कर्वे रोडवरील तळ अधिक सात मजली आयकर भवनची इमारत आहे. या इमारतीत अडीच हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी २.०१ वाजण्याच्या सुमारास ७ ते ८ हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या तळ घरात अग्नी भडका उडाला. काही वेळात आग वाऱ्यासारखी पसरली आणि इमारतीत धुराचे लोट पसरले.
आगीची तीव्रता आणि तळघरातून इमारतीत पसरलेल्या दाट धुरामुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरले. मुंबई अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन दलाच्या आठहून अधिक गाड्यासह दाखल झाले. जवानांनी दोन उच्चदाबाच्या पाण्याच्या वाहिन्या, तीन मोठ्या आणि चार छोट्या होज लाईन्सचा वापर करून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले. धुराचे लोट पसरलेल्या भागात ब्रीदिंग अॅपरेटस सेट परिधान करून २० जवानांनी प्रवेश केला. इमारतीतील धूर बाहेर काढण्यासाठी स्मोक एक्स्ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला.
इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फोडल्याने धूर बाहेर फेकला गेला. यानंतर पहिला, दुसरा आणि तिसरा मजला येथे अडकलेल्या १५ जणांना जिन्याच्या मार्गाने सुरक्षितपणे खाली आणण्यात आले. आणखी पाच ते सहा जणांची अँगस शिडीच्या सहाय्याने पहिल्या मजल्यावरून सुटका करण्यात आली. तर छतावर आश्रय घेतलेल्या आठ जणांना टर्नटेबल शिडीच्या मदतीने खाली आणण्यात आले. अशा एकूण विविध मजल्यावरुन २८ जणांना रेस्क्यू करण्यात आल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.
आगीच्या वेळी लिफ्ट बंद पडल्याने बचावकार्यात आणखी अडचणी निर्माण झाल्या. धुरामुळे काही कर्मचाऱ्यांना जिन्याने खाली उतरणे कठीण झाले होते. दरम्यान, इमारतीतील सहकाऱ्यांनी तसेच अलार्म यंत्रणेने कर्मचाऱ्यांना वेळीच सतर्क केल्याने अनेकांना सुरक्षितपणे बाहेर पडता आले.
आगीच्या पार्श्वभूमीवर चर्चगेट रेल्वे स्थानकासमोरील, सिमेंट हाऊसजवळील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलिस, आयकर विभागाचे अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. आगीचे नेमके कारण काय, याबाबत तपास सुरू होता.
तळघर एकूण १२ हजार चौरस फूट क्षेत्राचे असून सुमारे ७ हजार ते ८ हजार चौरस फूट क्षेत्रात आग लागल्याची घटना घडली. या घटनेत विद्युत वायरिंग व विद्युत उपकरणे, पेंशनची कागदपत्रे, जुने रेकॉर्ड, कागदांचा साठा, भंगार साहित्य तसेच लाकडी पार्टिशन जळून खाक झाले. या घटनेचा मुंबई अग्निशमन दलाचे डिव्हिजनल अधिकारी पुढील तपास करीत आहेत.