मालमत्ता कर व पाणीपट्टी प्रणालीत सुधारणा करणार! महापौर रितू तावडे यांचा निर्धार, कंत्राटदारांची साखळी मोडीत काढणार X (Ritu Tawade)
मुंबई

मालमत्ता कर व पाणीपट्टी प्रणालीत सुधारणा करणार! महापौर रितू तावडे यांचा निर्धार, कंत्राटदारांची साखळी मोडीत काढणार

मुंबईकरांना मालमत्ता कर व पाणीपट्टीची बिले पाठवली जातात. परंतु पालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना कुठलाही अलर्ट मेसेज येत नसल्याने वेळेत बिल भरणे शक्य होत नाही आणि दंड आकारला जातो. हे टाळण्यासाठी मुंबईकरांना मालमत्ता कर व पाणीपट्टी बिल प्रणालीत सुसूत्रता यावी, यासाठी मालमत्ता आणि पाणीपट्टी प्रणालीत सुधारणा करण्याचा निर्धार महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला.

गिरीश चित्रे

मुंबई : मुंबईकरांना मालमत्ता कर व पाणीपट्टीची बिले पाठवली जातात. परंतु पालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना कुठलाही अलर्ट मेसेज येत नसल्याने वेळेत बिल भरणे शक्य होत नाही आणि दंड आकारला जातो. हे टाळण्यासाठी मुंबईकरांना मालमत्ता कर व पाणीपट्टी बिल प्रणालीत सुसूत्रता यावी, यासाठी मालमत्ता आणि पाणीपट्टी प्रणालीत सुधारणा करण्याचा निर्धार महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केला. दरम्यान, गेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेत उबाठाने तयार केलेली कंत्राटदारांची साखळी मोडीत काढणार असल्याचे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले. महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी दैनिक 'नवशक्ति' व 'फ्री प्रेस जर्नल' कार्यालयाला भेट दिली.

मुंबई महापालिकेत भाजप व शिंदे सेनेची सत्ता स्थापन झाल्यानंतर ११ फेब्रुवारीला रितू तावडे यांनी महापौरपदाची जबाबदारी स्वीकारली. महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांनी मुंबईकरांशी निगडीत प्रश्न हाताळण्यावर भर दिला आहे. मुंबईतील बेकायदा बांगलादेशी रोहिंग्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक बेकायदा फेरीवाले सोडून जात आहेत. मुंबईतील फुटपाथ हे मुंबईकरांसाठी मोकळे झाले पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे रितू तावडे यांनी सांगितले. मुंबईतील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केल्यानंतर अनेक आमदारांची पत्रे आली की, फुल विक्रेत्यांवर कारवाई करू नका, परंतु जे अधिकृत फेरीवाले आहेत, त्यांना वगळून बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच राहील, असा इशारा महापौर तावडे यांनी दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौरपदाची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. महापौरपदाची धुरा सांभाळल्यापासून क्षणाक्षणाला परीक्षा द्यावी लागते. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या की, गटार, नाले, फेरीवाले हेच महापौरांचे काम आहे का? वर्षा गायकवाड यांच्या या प्रश्नावर सडेतोड उत्तर देत महापौर म्हणाल्या की, जनतेने निवडून दिले आहे, त्यामुळे ढिगारा साफ करणे गरजेचे आहे, जनतेचे प्रश्न सोडवणे क्रमप्राप्त आहे.

गेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या काळात कंत्राटदारांचे राज्य होते. २०१४ पूर्वी आणि २०१४ नंतर मुंबईतील बदल दिसून येत आहे. आता शालेय साहित्य खरेदी जेम पोर्टलवरुन करण्यात येणार आहे. 'स्टॅडिंग'मधील 'अंडरस्टॅडिग' संपल्याने उबाठाला धक्का बसलाय, असा टोला महापौर रितू तावडे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त घ्या

दादर येथे बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली तर विरोधक म्हणाले दोन दिवसानंतर पुन्हा फेरीवाले बस्तान मांडणार. परंतु आजही दादरचा स्टेशन परिसर मोकळा श्वास घेतोय. कांदिवली येथे बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे अधिकारी गेले असता फेरीवाल्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले. यापुढे बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईसाठी जाताना पोलीस बंदोबस्त घ्या, अशा सूचना संबंधितांना केल्याचे त्यांनी सांगितले.

'झेन नेक्स्ट' तयार करणार

डॉक्टर, इंजिनिअरचे शिक्षण घेतले पण नोकरी मिळत नाही. त्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात ५० मुलांची निवड करण्यात येणार असून त्यांना पालिकेत सामावून घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्यावेळी दबाव होता म्हणून प्रस्ताव मंजूर केला

शिक्षण समिती अध्यक्ष असताना स्थायी समितीत गणवेश तयार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. मात्र मी विरोध केला की बुट बनवणारा व्यक्ती गणवेश कसा तयार करेल, परंतु त्यावेळी दबाव आला होता, असे सांगत महापौर रितू तावडे यांनी उबाठावर निशाणा साधला.

सोसायटी, वॉर्ड चकाचक तर लाखोंची बक्षीसे

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून प्रत्येकाने वॉर्ड शून्य कचरा केला, सोसायटी कचरामुक्त केली, नगरसेवकांनी आपला वॉर्ड 'डस्टबिन फ्री' केल्यास नगरसेवक निधीत १ कोटींची वाढ करण्यात येणार आहे. एकूण प्रत्येकाने आपला वॉर्ड चकाचक ठेवला तर लाखो रुपयांची बक्षिसे जिंकता येणार आहेत, असेही त्या म्हणाल्या.

कामाची दखल घेत 'माऊथ पब्लिसिटी'

गेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेत फक्त कंत्राटदारांना घेऊन बसले जात होते. मात्र आता भाजपची सत्ता आली असून पारदर्शकता भ्रष्टाचारविरहित कारभार यावर भर देण्यात आला असून महापौर कार्यालयात दररोज ३०० ते ४०० लोक आपले प्रश्न घेऊन येतात. काही प्रश्न तर अधिकाऱ्यांना फोन करून जागीच सोडवले जातात. एखाद्या व्यक्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्यावर तोच आणखी चार जणांना सांगतो की मॅडम पटकन काम करतात. महापौर कार्यालयातून बाहेर गेल्यावर लोकच माझ्या कामाचा दाखला देत 'माऊथ पब्लिसिटी' करतात, असेही त्या म्हणाल्या.

नालेसफाईवर 'आयआयटी मुंबई'चा वॉच

नालेसफाई पावसाळ्याआधी ८० टक्के, पावसाळ्यात १० टक्के आणि पावसाळ्यानंतर १० टक्के करणे बंधनकारक आहे. तसेच नाल्यांवर तरंगता कचरा असल्यास त्याचे फोटो वेबसाइटवर अपलोड करणे अनिवार्य आहे. नालेसफाईच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी 'आयआयटी मुंबई'चा वॉच असणार आहे, असेही महापौर रितू तावडे यांनी सांगितले.

स्वातंत्र्य ही तर व्यक्तीसापेक्ष कलाकृती

आजचे राशिभविष्य, २१ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Mumbai : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! विधान भवन मेट्रो स्थानकावर ए-२ गेटवरील लिफ्ट सुरू; ज्येष्ठ नागरिकांना मोठी सोय

Maharashtra Infra Update: JNPT ते मुंबई-पुणे-गोवा मार्ग जोडणाऱ्या प्रकल्पाला गती; १६ एप्रिलपासून टेंडर प्रक्रिया

Mumbai : निसर्ग उन्नत मार्ग महागला; ७५० रुपयांत मासिक पास योजना, विदेशी पर्यटकांसाठी ३ हजार फी