राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रविवार, ७ डिसेंबर रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. यामुळे प्रवाशांसह चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना दिलासा मिळणार आहे.
अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी मेगाब्लॉक रद्द
रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि विविध अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वे मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर दर आठवड्याच्या रविवारी ब्लॉक घेण्यात येतो. मात्र शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असून या दिवशी लाखोंच्या संख्येने देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. अनुयायी सुमारे चार ते पाच दिवस शिवाजी पार्क परिसरात असतात. त्यामुळे उपनगरीय लोकलला मोठी गर्दी असते. त्यामुळे अनुयायांची गैरसोय दूर करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉक रद्द केला आहे.
रविवारी पश्चिम रेल्वेकडून कोणताही ब्लॉक नाही
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण मुख्य मार्ग तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल हार्बर मार्गासह ट्रान्स-हार्बर व पोर्ट मार्गावर मध्य रेल्वेचा साप्ताहिक मेगा ब्लॉक राबवण्यात येणार नाही, असे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. मात्र रविवारी सर्व सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसारच चालणार आहेत. देखभालीचे काम करण्यासाठी शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजता गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यानपर्यंत अप आणि डाउन जलद मार्गावर ४ तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत सर्व जलद मार्गावरील गाड्या गोरेगाव व सांताक्रूझ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर धावतील, तर रविवारी पश्चिम रेल्वेकडून कोणताही ब्लॉक राहणार नाही, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.