मुंबई

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

क्रिकेटप्रेमींना सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेणाऱ्या आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ (ICC Men's T20 World Cup 2026) च्या भारत-इंग्लंड उपांत्य सामन्यामुळे दक्षिण मुंबईत गुरुवारी गर्दी होण्याची शक्यता आहे. वानखेडेवरील या हाय-व्होल्टेज लढतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण येऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यानुसार, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मेट्रो लाईन-३ (Aqua Line) ची सेवा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्रिकेटप्रेमींना सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

अतिरिक्त फेऱ्या आणि उशिरापर्यंत सेवा

गुरुवार, ५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता वानखेडे स्टेडियम येथे हा सामना रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर, दक्षिण मुंबईत होणारी गर्दी लक्षात घेऊन मेट्रो-३ अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दिवसभर तसेच उशिरापर्यंत अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार आहेत.

विशेष म्हणजे ५ मार्चला चर्चगेटहून शेवटची मेट्रो रात्री ११:५९ वाजता सुटणार असून, यामुळे सामना संपल्यानंतर चाहत्यांना घरी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

वाहतूक कोंडी कमी करणे आणि उपनगरीय रेल्वेवरील ताण हलका करणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी प्रवासाचे नियोजन आधीच करावे आणि गर्दी टाळण्यासाठी मेट्रो सेवेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

३३.५ किमीचा महत्त्वाचा भूमिगत मार्ग

ॲक्वा लाईन ही ३३.५ किमी लांबीची पूर्णपणे भूमिगत मेट्रो सेवा असून कफ परेड ते आरे कॉलनी (JVLR) दरम्यान २७ स्थानकांना जोडते. चर्चगेट, विधान भवन, हुतात्मा चौक आणि सीएसएमटी ही स्थानके वानखेडे स्टेडियमच्या जवळ असल्याने शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटी जलद आणि आरामदायी ठरणार आहे.

तसेच आरे, सीप्झ, विमानतळ परिसर, बीकेसी, वरळी आणि दादर भागातून येणाऱ्या चाहत्यांसाठी मेट्रो-३ हा सोयीस्कर पर्याय ठरणार आहे. यामुळे वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वे मार्गांवरील संभाव्य गर्दी टाळून थेट दक्षिण मुंबईत पोहोचणे अधिक सुलभ होईल.

वर्ल्ड कप सेमीफायनलच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील व्यापक वाहतूक नियोजनाचा हा महत्त्वाचा भाग असून, शहरातील क्रीडाप्रेमींना सुरक्षित, वातानुकूलित आणि सुरळीत प्रवासाचा अनुभव देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली