मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ वर तंत्रज्ञानाधारित पावसाळी सज्जता आराखडा कार्यान्वित केला आहे. मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंडित मेट्रो सेवा मिळावी, या उद्देशाने ही तयारी करण्यात आली आहे. तसेच एआय-आधारित पेन्टाेग्राफ मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
यावर्षी मेट्रो मार्गिका २ब आणि ९ या मार्गिका सुरू झाल्यानंतरचा हा पहिलाच पावसाळा आहे. त्यामुळे महा मुंबई मेट्रोला चार मार्गिकांची विशेष तयारी करण्याचे आदेश एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांनी दिले आहेत. मेट्रो स्थानके, डेपो, व्हायडक्ट आणि संबंधित मेट्रो पायाभूत सुविधांवर प्रवासी सुरक्षा, पाणी साचण्याची समस्या, आपत्कालीन प्रतिसाद, पायाभूत संरक्षण आणि विविध यंत्रणांशी समन्वय यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
मान्सून कृती आराखड्यांतर्गत ३९ कार्यरत मेट्रो स्थानकांवर प्रत्येकी ६४ सीसीटीव्ही कॅमेरे आधीच कार्यान्वित असून, मेट्रो मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ वर एकूण २,४९६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे व्यापक देखरेख जाळे तयार करण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांद्वारे प्रवाशांची हालचाल, स्थानक परिसर, प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि महत्त्वाच्या ऑपरेशनल भागांवर २४ तास लक्ष ठेवले जाणार आहे.
पाणी साचण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणी ३० आपत्कालीन पंप तैनात करण्यात आले आहेत. स्थानके, डेपो आणि व्हायाडक्टवरील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची गाळ, झाडाझुडपे आणि अडथळे दूर करून साफसफाई करण्यात आली आहे.
मेट्रो नेटवर्कवरील १,०७० इन्सुलेटरची प्रतिबंधात्मक तपासणी आणि देखभाल पूर्ण करण्यात आली आहे. तसेच २५ केव्ही केबल्स, पेन्टाेग्राफ, करंट ट्रान्सफॉर्मर्स, ट्रान्सफॉर्मर्स, आणि लाइटनिंग अरेस्टर्स (वीज चमकल्यावर नुकसान टाळण्यासाठी) यांची तपासणी व देखभाल करण्यात आली आहे.
रिअल-टाइम हवामान निरीक्षणासाठी १४ महत्त्वाच्या स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजणारी ॲनिमोमीटर यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामध्ये मेट्रो मार्गिका २अ वरील दहिसर पूर्व, डहाणूकरवाडी, वळणई, गोरेगाव पश्चिम आणि अंधेरी पश्चिम; मेट्रो मार्गिका ७ वरील राष्ट्रीय उद्यान, पोईसर, आरे, जोगेश्वरी पूर्व आणि गुंदवली; तसेच मेट्रो मार्गिका २ब आणि ९ वरील मानखुर्द, शिवाजी चौक, दहिसर आणि काशीगाव या स्थानकांचा समावेश आहे.
स्थानकांवर छतामधून पाणी गळती, प्लॅटफॉर्मवरील पाणी निचरा आणि पाणी अडकण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापनासाठी मेट्रो गाड्या
महत्त्वाच्या आपत्कालीन परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला आवश्यक साधनसामग्री पोहोचविण्यासाठी विशेष मेट्रो डब्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
एआय सज्ज तंत्रज्ञान
पारंपरिक पावसाळी तयारीसोबतच एमएमआरडीएने मेट्रो परिचालनात प्रगत तंत्रज्ञान आणि एआय-आधारित यंत्रणांचा वापर सुरू केला आहे. यामुळे सुरक्षा, पूर्वानुमानाधारित देखभाल, परिचालन कार्यक्षमता, महसूल व्यवस्थापन आणि प्रवासी अनुभव अधिक सक्षम होणार आहे. यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे मेट्रो मार्गिका २अ आणि ७ वर कार्यान्वित केलेली एआय-सक्षम ऑटोमेटेड पेन्टाेग्राफ कंडिशन मॉनिटरिंग सिस्टम. या प्रणालीमध्ये हाय-स्पीड कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून धावत्या गाड्यांवरील पेन्टाेग्राफची रिअल-टाइम तपासणी केली जाते.
संवादासाठी हेल्पलाइन क्रमांक
टोल फ्री :
१८००
८८९ ०५०५
१८००
८८९ ०८०८
आपत्कालीन संपर्क : ८४५२९०५४३४ ८६५२६३५३०१