Mumbai : मैदानाचे प्रदर्शन केंद्रात रूपांतर नको! प्रस्तावाला MFA चे हायकोर्टात आव्हान (Photo-SALMAN ANSARI)
मुंबई

Mumbai : मैदानाचे प्रदर्शन केंद्रात रूपांतर नको! प्रस्तावाला MFA चे हायकोर्टात आव्हान

वांद्रे येथील ऐतिहासिक नेव्हिल डीसोझा फुटबॉल मैदानाचे ‘प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र’ (एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर) मध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला मुंबई फुटबॉल असोसिएशनने (एमएफए) मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

उर्वी महाजनी

उर्वी महाजनी/मुंबई

वांद्रे येथील ऐतिहासिक नेव्हिल डीसोझा फुटबॉल मैदानाचे ‘प्रदर्शन आणि अधिवेशन केंद्र’ (एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर) मध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावाला मुंबई फुटबॉल असोसिएशनने (एमएफए) मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हा निर्णय मुंबईतील अत्यंत महत्त्वाच्या फुटबॉल क्रीडांगणांपैकी एक असलेले मैदान नष्ट करणारा ठरेल, असा दावा असोसिएशनने केला आहे.

याचिकेद्वारे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) ३ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केलेले पत्र आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) सुधार समितीने मे २०२६ मध्ये मैदानाचे आरक्षण बदलण्यासाठी दिलेली शिफारस यांना आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना (एमआरटीपी) कायदा, १९६६ च्या कलम ३७(१) अंतर्गत या मैदानाचे ‘क्रीडांगण आणि मोकळी जागा’ हे आरक्षण बदलून ते ‘अधिवेशन किंवा प्रदर्शन केंद्र’ करण्यासाठी हा बदल सुचवण्यात आला आहे.

प्रस्तावाला अंतरिम स्थगिती देण्याची विनंती

हा प्रस्ताव १० ऑगस्ट रोजी पालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी मांडला जाण्याची शक्यता असल्याने असोसिएशनने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे तसेच न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत मैदानाचे स्वरूप बदलणे, क्रीडा पायाभूत सुविधा हटवणे किंवा बांधकामाच्या दिशेने कोणतेही पाऊल उचलण्यापासून प्रशासनाला रोखावे, अशी अंतरिम स्थगिती देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.

१५ वर्षांपासून ‘एमएफए’कडे व्यवस्थापन

याचिकेत नमूद केल्यानुसार, म्हाडाने दिलेल्या परवानगीनुसार एमएफए गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून या मैदानाची देखभाल आणि व्यवस्थापन करत आहे. परवानगीचा कालावधी वाढवून मिळण्यासाठी ३१ जुलै २०२५ रोजी दिलेला अर्ज अजूनही म्हाडाकडे प्रलंबित आहे. हे मैदान मुंबईच्या फुटबॉल संस्कृतीचा कणा असल्याचे सांगताना असोसिएशनने स्पष्ट केले की, ८,४५० चौरस मीटरचे हे मैदान ‘फिफा’ मानकांचे कृत्रिम टर्फ (आर्टिफिशियल टर्फ) आणि सुमारे ५,००० प्रेक्षकांच्या बैठकीच्या व्यवस्थेने सुसज्ज आहे. येथे दरवर्षी ९०० हून अधिक अधिकृत सामने खेळवले जातात. मुंबईभरातील जवळपास ४०० युवा क्लब, ३०० वरिष्ठ संघ आणि १०,००० हून अधिक खेळाडू या मैदानावर सरावासाठी व सामन्यांसाठी अवलंबून आहेत.

कधीही भरून न येणारे नुकसान होईल

‘हे मैदान सध्या पूर्ण क्षमतेने सुरू असलेले आणि नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे क्रीडा संकुल आहे. ही जागा गमावल्यास त्यावर अवलंबून असलेले क्लब, प्रशिक्षक, लीग, खेळाडू आणि स्थानिक क्रीडा उपक्रमांचे भरून न येणारे नुकसान होईल,’ असे याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे.

परिसरात अनेक प्रदर्शनी मैदान

आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यापूर्वी प्रशासनाने कोणताही स्पोर्ट्स इम्पॅक्ट असेसमेंट, वापरकर्त्यांचे सर्वेक्षण किंवा पर्यायी जागेचा अभ्यास केला नाही तसेच परिसरात कन्व्हेन्शन सेंटर्सची कमतरता असल्याचा दावा फेटाळत जवळच ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’, ‘सेंट अँड्रू ऑडिटोरियम’ आणि ‘एमएमआरडीए प्रदर्शन मैदान’ यांसारखे पर्याय आधीच उपलब्ध असल्याचे एमएफएने निदर्शनाला आणून दिले आहे.

प्रक्रियेवर असोसिएशनचा आक्षेप

एमएफएने असा युक्तिवाद केला आहे की, मंजूर ‘सुधारित विकास नियोजन २०३४’मध्ये ही जागा ‘क्रीडांगण आणि मोकळी जागा’ म्हणूनच आरक्षित आहे. त्यामुळे १९८३ चा जुना वांद्रे रिक्लेमेशन आराखडा सध्याच्या विकास आराखड्यापेक्षा वरचढ ठरू शकत नाही. असोसिएशन ही या मैदानाची अधिकृत वापरकर्ती संस्था असतानाही, कोणतीही नोटीस न देता, सल्लामसलत न करता किंवा सुनावणी न घेता हा प्रस्ताव एकतर्फी आणला गेला.

जागा कन्व्हेन्शन कॉम्प्लेक्ससाठीच - म्हाडाचा दावा

ही जागा मूळ आराखड्यात कन्व्हेन्शन कॉम्प्लेक्ससाठीच प्रस्तावित होती आणि या प्रकल्पातून मिळणाऱ्या महसुलाचा वापर परवडणाऱ्या घरांच्या योजनांसाठी केला जाईल, अशी भूमिका म्हाडाने घेतली आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी