मुंबई

मुंबईकरांनो सावधान! मिठी नदीने ओलांडली धोक्याची पातळी

मुंबईत सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी झपाट्याने वाढत असून, मंगळवारी (दि. १९) पहाटे नदीने धोक्याची मर्यादा ओलांडली. परिणामी सखल भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

नेहा जाधव - तांबे

मुंबईत सलग कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी झपाट्याने वाढत असून, मंगळवारी (दि. १९) पहाटे नदीने धोक्याची मर्यादा ओलांडली. परिणामी सखल भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरी प्रशासन, अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली आहे.

नागरिकांचे स्थलांतर सुरू

कुर्ला पश्चिमेतील क्रांतीनगर परिसरात १४० हून अधिक झोपडपट्ट्यांतील कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक नागरिकांनी स्वतःहून उंच मजल्यांवर किंवा नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे. एल वॉर्डचे सहाय्यक आयुक्त धनाजी हिर्लेकर यांनी स्थलांतर मोहिमेवर थेट देखरेख ठेवत असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, मिठी नदीची वाढती पातळी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा केली आहे. नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क करण्यात आले असून गरज पडल्यास त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे.

मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

हवामान खात्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जाहीर केला आहे. पुढील काही दिवसांत वाऱ्याचा वेग ६५ किमी प्रतितास इतका वाढू शकतो. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी व स्थानिक संस्थांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

चार दिवसांपासून मुंबई व उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. दादर, कुर्ला, भांडुप आणि मानखुर्दसह अनेक सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली. हार्बर आणि मध्य रेल्वे मार्ग पूर्ण ठप्प झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Mumbai : म्हाडा लॉटरीसाठी मुदतवाढ; १४ मेपर्यंत करता येणार अर्ज, जाणून घ्या सविस्तर

प्रोबेशन कालावधी संपल्यानंतर कामावरून काढणे कायदेशीर; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

विधान परिषद निवडणूक : भाजपतर्फे विधान परिषदेसाठी जठार, कोल्हेंना उमेदवारी

पानसरेंच्या पुस्तकावरचा वाद असंवेदनशील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबईत वीजपुरवठा विस्कळीत; अनेक ठिकाणी ८ ते १० तास वीज गायब