मुंबई : वरुणराजाच्या आगमनाला काही दिवसच शिल्लक असून ८५ टक्के नाल्यातील गाळ उपसा केल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र सोमवारी सत्ताधारी पक्षासह विरोधकांनी नालेसफाई कामाची पहाणी केली. यावेळी पालिकेच्या झोन-५ मध्ये कुर्ला, चेंबूर, टिळकनगर, मानखुर्द, गोवंडी, टिळक नगर आदी भागातील नाले तुंबले असल्याचे आढळून आल्याने पालिकेतील सभागृह नेते गणेश खणकर आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीच नालेसफाई कामाचे तीनतेरा वाजले असून प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली. दरम्यान, नाल्यातील गाळ उपसा करणे, खोली वाढवणे ही कामे ३ जूनपर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले.
नालेसफाईच्या कामांबाबत स्थायी समितीच्या मागील बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांनी आगपाखड करत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच, त्यावेळी, स्थायी समितीने नालेसफाई कामांचा पाहणी दौरा करण्याची मागणी काही सदस्यांनी केली होती. विशेषतः विरोधी पक्षाच्या सदस्यांनी तशी मागणी केली होती. त्याची दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी २५ आणि २६ मे रोजी दोन दिवस नालेसफाई पाहणी दौऱ्याचे नियोजन गेल्या शुक्रवारी जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूर्व उपनगर विभागात नालेसफाई पाहणी दौरा केला. यावेळी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मिठी नदी, झोन-५ मधील नालेसफाई कामांची विशेषतः कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, सुभाषनगर येथील नाल्यांची दयनीय अवस्था पाहून ही नाराजी व्यक्त केली होती. कुर्ला, बीकेसी येथे मिठी नदीच्या पात्रात गाळ काढण्याचे काम सुरू असताना स्थायी समिती सदस्यांनी त्याठिकाणी भेट दिली. त्यावेळी सफाई कामासाठी पलटून आणि लाँगबूम या मशीनची कमतरता असल्याचे निदर्शनास आले.
पाहणी दौऱ्यात फक्त ७ सदस्यच उपस्थित!
या नालेसफाई पाहणी दौऱ्याला स्थायी समितीच्या २६ सदस्यांपैकी फक्त सात सदस्यांनी उपस्थिती नोंदवली. त्यात प्रभाकर शिंदे, सभागृह नेते गणेश खणकर, शिवसेनेच्या दीपमाला बढे, मीनाक्षी पाटणकर, काँग्रेस पक्षाचे गटनेते अशरफ आजमी, एमआयएम पक्षाचे जमीर कुरेशी, भाजपच्या प्रीती सातम या नगरसेवकांचा समावेश होता.
नालेसफाई फक्त कागदावरच - अशरफ आजमी
यंदा नालेसफाई कामांबाबत फक्त कागदावरच नियोजन करण्यात आले आहे. नालेसफाई कामाचे अनुभव नसलेल्या कंत्राटदाराला नालेसफाईचे काम देण्यात आले आहे. झोन-५ मधील सफाईचे काम काळ्या यादीतील कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाचे गटनेते अशरफ आजमी यांनी केला. आयुक्तांनी यंदा गाळाचे प्रमाण कमी होणार असल्याचे अगोदरच कशाच्या आधारे जाहीर केले? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
सफाई कामगारांच्या आरोग्याशी खेळ
काही ठिकाणच्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करणे गरजेचे होते. त्याठिकाणी गाळ काढताना सफाई कामगारांना ग्लोव्हज्, गमबूट, मास्क आदी सुरक्षितेचे साहित्य उपलब्ध करून देणे कंत्राटदाराची जबाबदारी आहे. मात्र नालेसफाईच्या कामात घाणीत उतरून सफाई कामगार काम करत आहेत. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने सफाई कामगारांची काळजी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे.