Mumbai : चाचणीदरम्यान मोनोरेलला अपघात; नवीन गाडीच्या डब्याचे नुकसान 
मुंबई

Mumbai : चाचणीदरम्यान मोनोरेलला अपघात; नवीन गाडीच्या डब्याचे नुकसान

बुधवारी सकाळी मोनोच्या चाचणीदरम्यान वडाळा डेपो मोनोरेल स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे अपघात झाला. मोनोमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघातामध्ये नवीन गाडीच्या डब्याचे अतोनात नुकसान झाले. या घटनेमुळे मोनोच्या दुर्घटनांची मालिका...

Swapnil S

मुंबई : मोनोरेलमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने ही सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. सध्या मोनोरेलच्या कार्यक्षमतेत आणि सुरक्षिततेत वाढ करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार मोनोच्या ताफ्यात दाखल झालेल्या नवीन गाड्यांची चाचणी सुरू आहे. बुधवारी सकाळी मोनोच्या चाचणीदरम्यान वडाळा डेपो मोनोरेल स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे अपघात झाला. मोनोमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या अपघातामध्ये नवीन गाडीच्या डब्याचे अतोनात नुकसान झाले. या घटनेमुळे मोनोच्या दुर्घटनांची मालिका सुरूच असल्याचे दिसून आले आहे.

मोनोरेलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने अनेकदा प्रवासी गाड्यांमध्ये अडकून पडल्याच्या घटना घडल्या होत्या. सतत होणाऱ्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘एमएमआरडीए’ने मोनोची संपूर्ण मार्गावरील सेवा २० सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. मोनोचे संचालन करणाऱ्या ‘महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (एमएमएमओसीएल) मोनोरेलमध्ये नवीन सिग्नल प्रणाली, नवीन मोनोगाड्या आणि तंत्रज्ञान आणण्याचे काम हाती घेतले आहे.

मोनोरेलच्या कार्यक्षमतेत आणि सुरक्षिततेत अधिक वाढ करण्यासाठी अत्याधुनिक ‘कम्युनिकेशन-बेस्ड ट्रेन कंट्रोल’ (सीबीटीसी) सिग्नलिंग प्रणालीची चाचणी सध्या सुरू आहे. या प्रणालीची अंमलबजावणी प्रकल्पाचे नियुक्त कंत्राटदार ‘मेधा एसएमएच रेल कंपनी’ करत आहे.

मोनोच्या ताफ्यात आलेल्या नवीन गाड्यांच्या चाचण्यांदरम्यान बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मोनोला अपघात झाला. सदोष सिग्नल यंत्रणेमुळे नियंत्रण कक्षाला गाडीचे स्थान ओळखता आले नाही. त्यामुळे गाडी दुसऱ्या रुळावर गेली. यावेळी गाडी गाईडवे बीमवर जाऊन धडकली. यामध्ये नवीन गाडीचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि ‘एमएमएमओसीएल’चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

अपघातावेळी गाडीमध्ये दोन तांत्रिक कर्मचारी आणि मोनोरेल ऑपरेटर कार्यरत होते. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी गाडीतून खाली उतरवले. यामध्ये मोनोरेल ऑपरेटरच्या डोक्याला मार लागला आहे, तर इतर कर्मचारी सुरक्षित आहेत. या घटनेमुळे मोनोच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुरक्षित सेवा पुरविण्यास कटिबद्ध असल्याचा दावा

या केवळ अंतर्गत तांत्रिक चाचण्या आहेत. मोनोरेलच्या दैनंदिन सेवा सुरू करण्यापूर्वी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या चाचण्या सुरू आहेत. ‘मेधा एसएमएच रेल कंपनी’मार्फत या नियमित चाचण्या सुरू आहेत. प्रवाशांची गैरसोय कमी व्हावी यासाठी काही चाचण्या सुट्टीच्या दिवशीदेखील पार पाडल्या जात आहेत. ‘एमएमएमओसीएल’ मुंबईकरांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक परिवहन सेवा पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे ‘एमएमएमओसीएल’ने म्हटले आहे.

“मी कोणत्या गोंधळात अडकलेय”! राहुल गांधींच्या दाव्यानंतर ब्राझिलच्या मॉडेलची पहिली प्रतिक्रिया; Video व्हायरल

Mumbai : BMC च्या महिला आरक्षण सोडतीची तारीख जाहीर; SC, ST आणि OBC प्रवर्गांसाठी प्रक्रिया सुरू

ऊसदराचे आंदोलन चिघळणार? कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर ऊस फेकण्याचा प्रयत्न

मुंबई आशियातील सर्वात 'आनंदी' शहर; बीजिंग आणि शांघायला मागे टाकत मारली बाजी

स्वदेशी 'इक्षक' जहाज आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार