मुंबई

Mumbai : फक्त ३०० मीटरवर ड्रग्ज कारखाना, मात्र पोलिसांना खबर नाही? नालासोपाऱ्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे निलंबन

नालासोपारा (पूर्व) येथील पेल्हार परिसरात शनिवारी (दि. २५) मुंबई पोलिसांनी मेफेड्रोन (MD) तयार करणाऱ्या मोठ्या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणानंतर केवळ तीन दिवसांतच पोलिस आयुक्त (मिरा-भाईंदर-वसई-विरार) निकेत कौशिक यांनी मोठी कारवाई केली आहे.

नेहा जाधव - तांबे

नालासोपारा (पूर्व) येथील पेल्हार परिसरात शनिवारी (दि. २५) मुंबई पोलिसांनी मेफेड्रोन (MD) तयार करणाऱ्या मोठ्या कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणानंतर केवळ तीन दिवसांतच पोलिस आयुक्त (मिरा-भाईंदर-वसई-विरार) निकेत कौशिक यांनी मोठी कारवाई केली आहे. त्यांनी या प्रकरणी हलगर्जी केल्याचा ठपका ठेवत, पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना निलंबित केले आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रातच हा अवैध कारखाना सुरू असतानाही त्यांनी त्याची दखल घेतली नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

फक्त ३०० मीटरवर होता ‘ड्रग्ज’ कारखाना

तपासानुसार, हा कारखाना पेल्हार पोलीस ठाण्यापासून अवघ्या २०० ते ३०० मीटर अंतरावर होता. तरीही स्थानिक पोलिसांना त्याची कल्पना नव्हती. चौकशीत वनकोटी यांनी “या कारवाईबाबत मला माहिती नव्हती” असे सांगितले, मात्र ही कारणमीमांसा वरिष्ठ पातळीवर अस्वीकार्य ठरली. त्यामुळे ‘कामात गंभीर दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा’ या कारणावरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

आयुक्त कौशिक यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, वनकोटी यांनी आपल्या अधिपत्याखाली असणाऱ्या अधिकारी आणि गुप्त माहिती प्रणालीवर प्रभावी नियंत्रण ठेवले नाही. गस्त, माहिती संकलन आणि अवैध व्यवसायांवर वेळेत कारवाई करण्यात त्यांनी निष्काळजीपणा दाखवला, असे आदेशात म्हटले आहे.

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

२५ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांच्या झोन-६ मादक पदार्थ विरोधी पथकाने, टिळकनगर पोलिसांच्या मदतीने, पेल्हार (पूर्व) येथील रशीद कंपाऊंडमधील कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ किलोपेक्षा अधिक मेफेड्रोन, त्यासाठी वापरले जाणारे रासायनिक पदार्थ, सुमारे १३.५ कोटींचे साहित्य आणि आणखी १ कोटींचा कच्चा माल जप्त केला.

ही कारवाई झोन-६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्या देखरेखीखाली पार पडली. छाप्यात मुंबईतील मादक पदार्थ वितरण साखळीशी जोडलेले एक मोठे जाळे उघड झाले आहे.

५ जणांना अटक; मुख्य सूत्रधार सोहेल खान

या प्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. त्यात मुख्य आरोपी म्हणून सोहेल अब्दुल सैफ अली खान याचे नाव समोर आले आहे. खान हा मूळचा मुंब्रा येथील असून, काही महिन्यांपूर्वी त्याने मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोन तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला होता, असा पोलिसांचा दावा आहे. गेल्या १० महिन्यांपासून हा अवैध कारखाना चालू होता आणि दरमहा सुमारे ५० किलो अमली पदार्थ तयार केले जात होते, असे तपासात समोर आले आहे. खानकडे BMW सह अनेक लक्झरी गाड्या असल्याचीही माहिती मिळाली आहे.

पेल्हार पोलिसांवर प्रश्नचिन्ह

पोलिस ठाण्याच्या अगदी जवळ अमली पदार्थांचा कारखाना सुरू असताना स्थानिक पोलिसांना त्याची कल्पना नसणे हे गंभीर असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे पेल्हार पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विभागीय चौकशीत वनकोटी यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अधिकाऱ्यांनी गस्त, गुप्त माहिती आणि तपास यामध्ये आवश्यक दक्षता न दाखवल्याचे निष्पन्न झाले आहे.

पुढील चौकशी सुरू

वनकोटी यांचे निलंबन झाल्यानंतर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्या संशयितांविरुद्ध गुन्हेगारी कारवाईही सुरु आहे. तपासादरम्यान मुंबईतील विविध भागांमध्ये कार्यरत असलेल्या ड्रग्ज पुरवठा साखळीचे विस्तृत जाळे उघडकीस आले आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

'बॅचलर्सना परवानगी नाही' म्हणत मालकिणीलाच घर खाली करायला सांगितलं; सोसायटी बोर्ड मेंबर्सना २२ वर्षांच्या तरुणीने शिकवला धडा

ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! वेळ आणि स्थळही सांगितलं; संजय राऊत यांची पोस्ट पुन्हा चर्चेत

राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीवर सुप्रिया सुळेंचे भाष्य; "ठाकरे बंधू एकत्र आले तर...

गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल

BCCIचा मोठा निर्णय! महिला खेळाडूही होणार मालामाल; देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ