मुंबई

मुंबईत तिसऱ्या दिवशीही आंदोलन; चेंबूर, दादरमध्ये आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

नीट पेपर फुटीप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बुधवारी मुंबईत विविध ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कडक कारवाई करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

Swapnil S

मुंबई : नीट पेपर फुटीप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी बुधवारी मुंबईत विविध ठिकाणी तीव्र निदर्शने करण्यात आली. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कडक कारवाई करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत शेकडो लोकांनी कथित नीट पेपरफुटीविरोधात मुंबईत अनेक ठिकाणी एकत्र येत निदर्शने केली. चेंबूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ कडक पोलीस बंदोबस्तात शेकडो आंदोलक जमा झाले होते. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ओढत पोलीस गाड्यांमध्ये टाकून स्थानिक पोलीस ठाण्यात नेल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला. चेंबूरमधील आंदोलक शिक्षण व्यवस्थेत सुधारणा आणि पेपरफुटीवर कारवाईची मागणी करणारे फलक घेऊन आले होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे यांनी चेंबूर येथील आंदोलनस्थळाला व नंतर पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यांच्या मध्यस्थीनंतर ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्यात आली.

दादर येथील शिवाजी पार्क येथे बुरखा परिधान केलेल्या एका महिलेला आंदोलन करताना पोलिसांनी रोखले असता, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या व तिच्या शेजारी आंदोलनाला बसल्या.

तसेच दादर येथील शिवसेना भवनाबाहेर सलग तिसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते आणि त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्व आंदोलन स्थळांवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मालमत्तेच्या मालकी हक्काबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निबंधकांना नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्वाळा

Mumbai : राणीबागेतील बंगला उपमहापौरांना नाहीच; जलविभागाच्या अखत्यारीतील बंगल्याची आता चाचपणी

CJP Protest Delhi : जागा सोडू नका; मनोज जरांगे यांचा सल्ला

जेनेरिक औषधांवर २०० टक्के आयातकर- ट्रम्प; ऑगस्ट २०२८ नंतर होणार लागू, सर्वाधिक फटका भारताला

शिंदे चार दिवसांपासून दरे गावी, चर्चांना उधाण