मुंबई : बंद एनटीसी गिरणी कामगारांना गेल्या बारा महिन्याचा पगार मिळालेला नाही. तसेच गेल्या वर्षभरात निवृत्त होणाऱ्या कामगारांना ग्रॅच्युईटी मिळालेली नाही. ३८ महिन्यांचा अर्धा पगार तर बारा महिन्यांचा पगार नसल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत. यामुळे कामगारांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने मुंबईमधील टाटा, इंदू मिल क्रमांक पाच, पोदार आणि दिग्विजय या गिरण्यांवर सर्वश्री गोविंदराव मोहिते, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कामगारांचे बेमुदत साखळी उपोषणे सुरू आहे.
एनटीसी व्यवस्थापनाकडून अद्याप कोणताही तोडगा पुढे आलेला नाही, तेव्हा उपासमारीचे जीवन जगणारे गिरणी कामगार वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करतील किंवा जिवाचे बरे-वाईट करतील, याची जबाबदारी संबंधित पोलीस स्टेशनने उचलावी, असे लेखी निवेदन राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने खजिनदार निवृत्ती देसाई यांनी भोईवाडा पोलीस स्थानकाला दिले आहे. त्यामुळे एकूणच या विषयावरून वातावरण तापले आहे.
कामगार वैफल्यग्रस्त
विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण ७ सप्टेंबरपासून सुरू झाले असून आज २८ दिवस लोटले आहेत. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनांनी केले होते. त्याप्रमाणे कामगारही आंदोलनात सहभागी झाले आहेत. या प्रश्नी कामगार नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी केंद्र सरकारची भेट घेऊन हा प्रश्न सरकारच्या कानावर घातला आहे. आतापर्यंत कोणताही तोडगा समोर न आल्याने कामगार वैफल्यग्रस्त झाले आहेत.