मुंबई : पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची लागवड करणे काळाची गरज बनली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून राज्यात वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण मोहिमेंतर्गत आतापर्यंत ५ कोटी ३२ लाख ८० हजारांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वृक्ष लागवडीत मुंबईने १०० टक्के उद्दिष्ट साध्य केल्याचे महाराष्ट्र राज्याच्या वन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ७ जिल्ह्यांत ६० टक्क्यांपेक्षा कमी वृक्षारोपण झाले आहे.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांची लागवड व झाडांचे संवर्धन करणे भविष्याची गरज आहे. महाराष्ट्रात वनक्षेत्र (ग्रीन कव्हर) २१.२५ टक्क्यांवरून ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत वन विभागाने यावर्षी पावसाळ्यात १० कोटी रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सरकारने सर्व विभागांना वृक्षारोपणाचे उद्दिष्ट दिले असून सर्व विभागांना रोपे लावल्यानंतर वन विभागाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, राज्यात ४ कोटी ३२ लाख ८० हजारांहून अधिक रोपांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. तर राज्यात १ कोटींहून अधिक रोपांचा ऑफलाइन डेटा उपलब्ध झाला आहे. परंतु, इंटरनेट आणि दुर्गम भागात इतर समस्यांमुळे ऑफलाइन वृक्षारोपणाचा डेटा ऑनलाइन नोंदणी करण्यास अडचण येत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली असून या मोहिमेंतर्गत मुंबई शहराने १०० टक्के, ठाणे जिल्ह्याने ७२.८० टक्के, मुंबई उपनगरात ७०.४३ टक्के, पुण्याने ५९.१९ टक्के व नागपूरने ५४.०९ टक्के वृक्षारोपण केल्याचे आकडेवारी वरून आहे. तर सांगली जिल्ह्याने केवळ ४१.०२ टक्के लागवड केली आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर ८६.८७ टक्के आणि अहिल्यानगर जिल्ह्यात ९५.७३ टक्के टक्के तर जिल्ह्यांनीही चांगली प्रगती केली आहे. सात जिल्ह्यांत अजूनही ६० टक्क्यांपेक्षा कमी वृक्षारोपण झाले आहे. दरम्यान, वन विभागाच्या रोपवाटिकेत सुमारे २ कोटी रोपे उपलब्ध होती. वन विभागाने त्याचा वापर केला असून उर्वरित रोपे खासगी रोपवाटिकांकडून खरेदी करण्यास विभागांना सांगण्यात आले आहे. सध्या पाच कोटी वृक्ष लागवड झाली असून उर्वरित रोपे लावण्याचे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.