मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) विकसित केलेल्या ‘मुंबई वन’ या सामायिक मोबिलिटी ॲपने एकूण १ कोटी तिकीट व्यवहारांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी या ॲपद्वारे आतापर्यंत १ कोटी ४ लाख ११ हजार ८२४ तिकिटे बुक करण्यात आली आहेत. केवळ १० महिन्यांत या ॲपला मोठा प्रतिसाद लाभला असून ‘मुंबई वन’ चे प्रवासी ॲपच्या वापरात आघाडीवर आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर २०२५ रोजी ‘मुंबई वन’ ॲपचे लोकार्पण करण्यात आले. मुंबई महानगर प्रदेशातील विविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्था एकाच डिजिटल प्लेटफॉर्मवर आणून लाखो प्रवाशांचा विविध वाहतूक साधनांद्वारे होणारा प्रवास अधिक सोपा करण्याच्या उद्देशाने ‘मुंबई वन’ची संकल्पना साकारण्यात आली. लोकार्पणानंतर १० महिन्यांत या प्लॅटफॉर्मने एक कोटी तिकीट व्यवहारांचा टप्पा पार केला आहे. तर ॲपचे ८ लाख १६ हजार ४०२ डाउनलोड्स नोंदविण्यात आले आहेत. एकूण डाउनलोड्सपैकी ७४ टक्के अण्ड्रोइड, तर २६ टक्के आयवोएस वापरकर्ते आहेत.
बुकिंगचे प्रमाण ८० टक्के
मेट्रो मार्गिका २अ, ७, २ब आणि ९ यांच्यासाठी एकत्रितपणे सर्वाधिक ३० लाख १० हजार ५५४ तिकिटे बुक करण्यात आली आहेत. तर मेट्रो मार्गिका- १ च्या प्रवासासाठी २८ लाख ४७ हजार ६८२ प्रवाशांनी या ॲपवरून तिकिटे घेतली आहेत. तर मेट्रो मार्गिका-३ साठी २४ लाख ३० हजार ३७० तिकिटे बुक करण्यात आली आहेत. या मेट्रो सेवांसाठी ‘मुंबई वन’ ॲपवारे एकूण ८२ लाख ८८ हजार ६०६ तिकिटे बुक करण्यात आली असून ‘मुंबई वन’वरील एकूण तिकीट व्यवहारांपैकी हे प्रमाण जवळपास ८० टक्के आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी १५ लाख ७० हजार ९०६ तिकिटे बुक करण्यात आली आहेत.
इतर वाहतुकीसाठीही मुंबई वनचा वापर
बेस्ट बस सेवा आणि नवी मुंबईतील मेट्रो सेवेसाठीही प्रवासी ‘मुंबई वन’ ॲपचा वाढत्या प्रमाणावर वापर करत आहेत. नवी मुंबई मेट्रो मार्गिका १ साठी ३ लाख ३८ हजार ७१८ तिकिटे, त्याखालोखाल बेस्टसाठी १ लाख ५३ हजार ३२३, टीएमटीसाठी ३३ हजार ७०६, एनएमएमटीसाठी १६ हजार ६९८, एमबीएमटीसाठी ७ हजार ५५३ आणि केडीएमटीसाठी २ हजार ३१४ तिकिटे बुक करण्यात आली आहेत.