मुंबई 'पाताळलोक'चे काम वेगवान; ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भुयारी बोगद्याचे ६५० मीटर खोदकाम पूर्ण संग्रहित छायाचित्र
मुंबई

मुंबई 'पाताळलोक'चे काम वेगवान; ऑरेंज गेट-मरीन ड्राइव्ह भुयारी बोगद्याचे ६५० मीटर खोदकाम पूर्ण

मुख्य बोगद्याचे खोदकाम सुरू झाल्यानंतर सुमारे पाच महिन्यांनंतर एमएमआरडीएच्या महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भूमिगत रस्ता प्रकल्पाने (पाताळलोक) महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या प्रकल्पातील सुमारे ६५० मीटर लांबीचे उत्खनन काम पूर्ण झाले आहे.

प्रतिनिधी

स्वीटी भागवत/मुंबई :

मुख्य बोगद्याचे खोदकाम सुरू झाल्यानंतर सुमारे पाच महिन्यांनंतर एमएमआरडीएच्या महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भूमिगत रस्ता प्रकल्पाने (पाताळलोक) महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या प्रकल्पातील सुमारे ६५० मीटर लांबीचे उत्खनन काम पूर्ण झाले आहे.

भारतातील सर्वात खोल आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक नागरी रस्ते पायाभूत सुविधांपैकी हा एक प्रकल्प आहे. टनेल बोरिंग मशिनच्या (टीबीएम) सहाय्याने मुख्य उत्खननाला २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरुवात झाली होती. मुंबईच्या गुंतागुंतीच्या किनारी भूगर्भातून मार्ग काढत टीबीएम यंत्राने ६५० मीटर उत्खनन पूर्ण केले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन ३ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा ‘एमएमआरडीए’चे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर ८ जानेवारी २०२६ रोजी टीबीएमद्वारे सुरुवातीचे खोदकाम सुरू झाले आणि २६ जानेवारी २०२६ पासून बोगद्यात कायमस्वरूपी रिंग बसवण्याचे काम हाती घेण्यात आले.

३१ जानेवारी रोजी प्राथमिक टप्पा पूर्ण झाल्यानंतर २८ फेब्रुवारीपासून मुख्य उत्खननाला गती देण्यात आली. २६ मार्च २०२६ पर्यंत ७० मीटरचे उत्खनन पूर्ण झाले होते. हा जोड बोगदा (ट्विन टनेल) एकूण ७ किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचा असून, सध्या बांधकामाधीन असलेल्या पहिल्या बोगद्याची लांबी ३.४५ किलोमीटर आहे. हा मार्ग जमिनीखाली जवळपास ५२ मीटर खोलवरून जात असून, तो मध्य व पश्चिम रेल्वे मार्गिका तसेच भूमिगत मेट्रो मार्गिका-३ च्या खालून जातो. यामुळे हे भारतातील अत्यंत क्लिष्ट आणि आव्हानात्मक नागरी भुयारी काम मानले जात आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, या भुयारी मार्गामुळे दक्षिण मुंबईतील विद्यमान रस्त्यांवरील वाहतूककोंडी कमी होईल, मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीला वेग मिळेल. तसेच थेट भूमिगत मार्ग उपलब्ध झाल्याने इंधनाची बचत होऊन वाहनांमधून होणारे प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल.

प्रकल्पाचा प्रवास

  • ३ डिसेंबर २०२५ : टीबीएमचे लोकार्पण

  • डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ : बॅकअप प्रणाली, हायड्रॉलिक व विद्युत जोडण्या आणि सेन्सर कॅलिब्रेशन पूर्ण

  • ८ जानेवारी २०२६ : प्राथमिक टनेलिंगला सुरुवात

  • २६ जानेवारी २०२६ : कायमस्वरूपी बोगद्याच्या रिंग बसविण्याचे काम सुरू

  • ३१ जानेवारी २०२६ : प्राथमिक टनेलिंग टप्पा पूर्ण

  • २६ फेब्रुवारी २०२६ : मुख्य टनेलिंग टप्प्यात प्रवेश

  • २८ फेब्रुवारी २०२६ : मुख्य बोगदा खोदकामाला प्रारंभ

  • २६ मार्च २०२६ : ७० मीटर खोदकाम पूर्ण

  • जुलै २०२६ : सुमारे ६५० मीटर खोदकाम पूर्ण; मुंबईतील सर्वात महत्त्वाकांक्षी भूमिगत वाहतूक प्रकल्पाने गाठला महत्त्वाचा मैलाचा दगड.

प्रवास अवघ्या पाच मिनिटांत पूर्ण होणार

हा बोगदा वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दरम्यानचा प्रवास अवघ्या पाच मिनिटांत पूर्ण होणार आहे. हा हायस्पीड कॉरिडॉर दक्षिण मुंबईला मुंबई कोस्टल रोड आणि अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूशी थेट जोडणार आहे. या थेट भूमिगत मार्गामुळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन इंधनाची बचत होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दक्षिण मुंबईला मिळणार पहिले आंतरराष्ट्रीय अधिवेशन केंद्र; मुंबई पोर्टकडून DPR साठी तांत्रिक सल्लागारांची मागणी

राज्य सरकारची भूमिका मोदींच्या मतांहून वेगळी का? POP गणेशमूर्तींबाबत हायकोर्टाचा सवाल

कोकणात ऑरेंज अलर्ट, वादळी वाऱ्यांचा इशारा; घाटमाथा, विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज

पोलिसी लाठीमाराचे समर्थन होऊ शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai : वाहतूककोंडीवर भूमिगत बोगद्यांचा उतारा; सहा महिन्यांत आराखडा; ४ ते ५ हजार कोटींचा खर्च अपेक्षित