मुंबई : ३१ मे पूर्वी मुंबईतील सगळी मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करा, असे निर्देश पालिका प्रशासनाने संबंधित यंत्रणेला दिले होते. मात्र १ लाख ३ हजार ९२६ मॅनहोलपैकी ९६ हजार ३९३ मॅनहोलवर संरक्षण जाळ्या बसवण्यात आल्या आहेत, तर १८०० मॅनहोल रस्ते कामात बुजले गेले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत ४ हजार ४४६ उघड्या मॅनहोलचा धोका कायम आहे. दरम्यान, मुंबईतील सगळ्या मॅनहोलची तपासणी करून ७ दिवसांत अहवाल सादर करा, असे निर्देश संबंधित विभागाला दिल्याचे पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या मलनिस्सारण व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे असे एकूण १ लाख ३ हजार ९२६ मॅनहोल आहेत. ऑगस्ट २०१७ मध्ये परळ येथील उघड्या मॅनहोलमध्ये पडून बाॅम्बे रुग्णालयाचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर प्रत्येक पावसाळ्यात मुंबईतील मॅनहोलचा प्रश्न चर्चेत येतो. साकीनाका येथील खैराणी रोडवरील उघड्या मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षिय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा मॅनहोलचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पालिका आयुक्तांचे आदेश आधीच!
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मासिक आढावा बैठकीत १६ मे २०२६ रोजी मॅनहोल्सना संरक्षण जाळ्या बसविण्याचे निर्देश दिले होते. हा मुद्दा क्रमांक १ प्राधान्याने अंमलात आणण्याचे निर्देश सर्व परिमंडळ उपायुक्त व सहायक आयुक्त यांना दिले होते.
झाकणे चोरीला
मुंबईत १ लाख ३ हजार ९२६ मॅनहोल असून ९६ हजार ३९३ मॅनहोलवर संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत, तर १,५८३ मॅनहोलवरील झाकणे चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.