'पिंक टॉयलेट'मध्येच कॅफे! फॅशन स्ट्रीटजवळील प्रकार उघड; स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह, Video  
मुंबई

Mumbai : 'पिंक टॉयलेट'मध्येच कॅफे! फॅशन स्ट्रीटजवळील प्रकार उघड; स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह, Video

मुंबईतील फोर्ट परिसरातील फॅशन स्ट्रीटजवळील महिलांसाठीच्या ‘पिंक टॉयलेट’ बसमध्ये अनधिकृत कॅफे चालवला जात असल्याचा प्रकार समोर आला. स्वच्छता आणि आरोग्याबाबत प्रश्न निर्माण झाल्यानंतर बीएमसीने तातडीने कारवाई करत कॅफे बंद केला.

Mayuri Gawade

मुंबईत महिलांसाठी उभारलेल्या 'पिंक टॉयलेट' सुविधेचा गैरवापर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फोर्टमधील फॅशन स्ट्रीट परिसरात उभ्या असलेल्या स्वच्छतागृह बसच्या मागील भागात अनधिकृत कॅफे चालवला जात असल्याचे उघड झाल्यानंतर स्वच्छता आणि कायदेशीरतेबाबत प्रश्न निर्माण झाले. प्रकरण समोर येताच बीएमसीने तातडीने कारवाई करत हा कॅफे बंद केला.

बीएमसीने गर्दीच्या भागात महिलांना सुरक्षित आणि स्वच्छ सुविधा मिळाव्यात म्हणून ‘महिलांसाठी स्वच्छतागृह’ या संकल्पनेतून या बस सुरू केल्या आहेत. या पिंक टॉयलेटमध्ये शौचालय, कपडे बदलण्याची खोली आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असतात.

मात्र, 'मिड-डे'ने दिलेल्या वृत्तानुसार, फॅशन स्ट्रीटजवळील या बसच्या मागील भागात जवळपास वर्षभर अन्नपदार्थ विक्रीचा स्टॉल चालवला जात होता. प्रसाधनगृह आणि खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी असल्याने स्वच्छता आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

परवानगीवरून वाद

या कॅफेच्या व्यवस्थापक गीता मेहर यांनी स्थानिक माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या नावाचा उल्लेख करत परवानगी असल्याचा दावा केला. त्या त्यांच्या कार्यालयात काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, आवश्यक परवाने किंवा कागदपत्रे त्यांच्या ताब्यात नसल्याचे त्यांनी मान्य केले.

दरम्यान, आमदार राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले की, मेहर यांना केवळ अर्जदार म्हणून विचार करण्याची शिफारस करण्यात आली होती. "त्याचा अर्थ वैध परवान्याशिवाय व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे, असा होत नाही" असे सांगत त्यांनी या प्रकारणापासून स्वतःला दूर ठेवले.

महापालिकेची धडक कारवाई

प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांनी पाठपुरावा केल्यानंतर बीएमसी प्रशासनाने गुरुवारी रात्री कारवाई केली. ‘ए’ वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कॅफे बंद करत किचनचे साहित्य आणि उपकरणे जप्त केली. या ठिकाणी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा आरोग्य विभागाचे प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले.

महिलांसाठी राखीव असलेल्या सुविधेचा अशा प्रकारे व्यावसायिक वापर झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून, अशा गैरवापरावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Mumbai Local Train Update : कल्याण-बदलापूर मार्गिका २०२८ मध्ये; बोरिवली-विरार ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम ३०% पूर्ण

Mumbai: चर्चगेटच्या आयकर भवनात भीषण आग; अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, VIDEO

Pune : खर्च भागेना म्हणून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव! रडतानाचा VIDEO पाठवून कुटुंबीयांकडून मागितले ५ लाख

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे गाढ झोपेत असतानाच हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा करूण अंत, अनेकजण गंभीर, VIDEO

महिलेचे फोटो काढले, जाब विचारला तर पिस्तूल रोखली; दिल्ली मेट्रोत गोंधळ, CISF जवान निलंबित